पश्चिम बंगाल न्यायालयाकडून अंतरिम जामीन : २४ जून रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात शरण येण्याचे आदेश
पणजी : ‘समग्र शिक्षा अभियान’च्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५.३६ कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा शाखेने मुख्य सूत्रधार सुभाशीष सिकदर आणि म्रिगंका जाॅदिर या दोघांच्या मुसक्या आवळल्या. यातील सुभाशीष सिकदर याला पश्चिम बंगाल येथील न्यायालयाने अंतरिम जामीन देऊन २४ जून रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात शरण येण्यास सांगितले आहे.
‘समग्र शिक्षा अभियाना’चे संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मार्च २०२५ मध्ये अभियानच्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५.३६ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद केले होते. पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिताराम मळीक यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयित पश्चिम बंगालमधील असल्यामुळे पोलिसांचे पथक पाठवून पाच जणांना अटक केली. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा तपास महिला निरीक्षक संध्या गुप्ता करीतत आहेत. याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुभाशीष सिकदर आणि म्रिगंका जाॅदिर यांची माहिती मिळाली. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हिरू कवळेकर, कॉ. रुपेश गायकवाड आणि पर्वरी पोलीस स्थानकातील कॉ. दिप्तेश परब व शिवम कवळे हे पथक शनिवार, ७ रोजी पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले. या पथकाने ११ रोजी मुख्य सूत्रधार सुभाशीष सिकदर आणि म्रिगंका या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर सुभाशीष याने तेथील न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन देत २४ जून रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात शरण जाण्याचा निर्देश जारी केला. त्यानंतर पथक म्रिगंका याला घेऊन गुरुवार, १२ रोजी गोव्यात आले. त्याला शुक्रवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केला असता, न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
आतापर्यंत सात जणांना अटक
‘समग्र शिक्षा अभियाना’ च्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५.३६ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. हे सर्व मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. यात रॉबीन पॉल, पूर्णशीष साना उर्फ सुमन, सुमंता मोंडल, आलामिन मोंडल, बिद्याधर मलिक, सुभाशीष सिकदर आणि म्रिगंका जाॅदिर यांचा समावेश आहे.