व्यावसायिक ब्रुनो फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा दाखल
पणजी : हेल्थ सेंटरमध्ये नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून २०२३ पासून २७ वर्षीय महिलेवर बार्देश परिसरात तसेच गोव्याबाहेर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी व्यावसायिक ब्रुनो फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फर्नांडिस याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
ब्रुनो फर्नांडिस हा आपचा २०२२ मधील हळदोणाचा उमेदवार होता. त्याने आप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेने ११ रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित व्यावसायिक ब्रुनो फर्नांडिस याने सदर महिलेला त्याच्या हेल्थ सेंटरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून २०२३ मध्ये गोव्यात आणली. त्यानंतर हेल्थ सेंटरमध्ये नोकरी दिली. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संशयिताच्या हळदोणातील घरात आणि गोव्याबाहेर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला पर्वरी परिसरात राहण्याची व्यवस्था करून दिली. याशिवाय संशयिताच्या मित्रांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी संशयित ब्रुनो याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७०, ३७० ए (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संबंधित गुन्हा म्हापसा पोलीस स्थानकाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आला आहे.
अटकपूर्व जामिनासाठी धाव
संशयित ब्रुनो फर्नांडिस याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.