बाल न्यायालयात १९ जून रोजी शिक्षेवर सुनावणी
पणजी : काणकोण तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर २०१७ मध्ये लैंगिक अत्याचार, तर तिच्या बहिणीचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने वडिलांना दोषी ठरविले आहे. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे. १९ जून रोजी शिक्षेवर सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, वडिलाने ऑगस्ट २०१६ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या बहिणीचा विनयभंग केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, काणकोणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेमेडिओस डिसोझा यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६,३२३ ३५४, गोवा बाल कायद्याचे कलम ८ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित वडिलाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर बाल न्यायालयाने संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. बाल न्यायालयाने सुनावणी घेतली असता, साक्षीदारांची साक्ष व वैद्यकीय अहवाल सकारात्मक आल्याचे निरीक्षण नोंदवून संशयित वडिलाला दोषी ठरविले आहे. दरम्यान, १९ जून रोजी शिक्षेवर सुनावणी होणार आहे.