अमेरिकेने इराणला दिला कोणतेही चुकीचे पाऊल न उचलण्याचा धमकीवजा इशारा
तेल अविव : इस्रायलने नुकतेच इराणच्या लष्करी प्रमुखांवर, नागरी अधिकाऱ्यांवर आणि अणुउद्योगाशी संबंधित ठिकाणी लक्ष्य करून हवाई हल्ले केले होते. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या कारवाईनंतर इराणने उत्तररात्री २.३०च्या सुमारास जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर शंभरहून अधिक ड्रोन डागलेत. या घटनेमुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील तणाव अधिकच गडद झाला आहे.
इराणने आधीच इस्रायलला इशारा दिला होता की, या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरला. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून तब्बल १०० हून अधिक ड्रोन इस्रायलच्या दिशेने पाठवण्यात आले. हे ड्रोन इस्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे सात तासांचा कालावधी लागतो.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते एफी डेफ्रीन यांनी सांगितले की, सर्व प्रकारच्या हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून शक्य तितक्या ड्रोनचा वेळीच नाश करण्यात येत आहे. इस्रायलवर ओढवलेला हा प्रसंग नेहमीपेक्षा वेगळा आहे. पुढचे काही तास अतिशय कठीण असतील. लोकांनी संयम बाळगावा, असे त्यांनी म्हटले. आज तेल अविवच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३० च्या सुमारास इस्रायली संरक्षण दलाने ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू केली होती. काही तासांनंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जाहीर केले, मात्र सर्वच ड्रोन निष्प्रभ करण्यात आले की नाही, याबाबत सुस्पष्टता दिली गेली नाही.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील सर्व दवाखान्यांना तातडीने सुरक्षित भागात स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच तातडीचे रुग्णच दवाखान्यात यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. जेरुसलेममधील हदासाह रुग्णालयात ‘फुल एमर्जन्सी मोड’ लागू करण्यात आला आहे. इस्रायली रक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी यापूर्वीच म्हटले होते की, तेहरानकडून तात्काळ प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, अमेरिकेने मध्यपूर्वेतील काही देशांमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल, गाझा आणि वेस्ट बँकेत दूतावास कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे निर्देश दिले आहेत.
संघर्षाचे परिणाम केवळ इस्रायल-इराणपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जोर्डन, इराक आणि इराण यांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. जोर्डनने आपल्या हद्दीत शिरलेल्या काही क्षेपणास्त्रांवर कारवाई करत त्यांना पाडले, अशी माहिती जोर्डनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या क्षेपणास्त्रांमुळे नागरी भागांवर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान, इस्रायली नागरिकांनी अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन इस्रायल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केले आहे. देशातील अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले असून भविष्यात या संघर्षाचे व्यापक स्वरूप धारण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून या परिस्थितीकडे लक्ष ठेवले जात असून दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
शुक्रवारी (मध्यपूर्वेतील वेळेनुसार) सकाळी इस्रायलने इराणमधील नतान्झ या महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यात नुकतेच नेतन्याहूंच्या आदेशानुसार इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डच्या (आयआरजीसी) काही वरिष्ठ कमांडर्सना ठार करण्यात आले. दरम्यान इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या म्हणण्यानुसार, नतान्झ केंद्राला केवळ जुजबी नुकसान झाले असून, त्याची अण्वस्त्र समृद्धी करणारी यंत्रणा ही जमिनीत खोलवर असून ती सुरक्षित आहे.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेता आयतउल्लाह अल खामेनेई यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांच्या जागी नव्या कमांडर्सची नियुक्ती केली आहे. ब्रिगेडियर जनरल मोहम्मद पकपूर यांना आयआरजीसीचा नवीन प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर मेजर जनरल अब्दुलरहीम मुसावी यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि अली शादमानी यांची ‘खातम अल-अनबिया’ मुख्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
नेतन्याहूंनी अनेक वर्षे दिलेले युद्धजन्य इशारे आता प्रत्यक्ष कृतीत उतरले आहेत.या घडामोडी अमेरिकेने पुन्हा एकदा इराणसोबत अणुकराराच्या वाटाघाटी सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर घडल्याने, इस्रायलने उचललेले हे पाऊल जगभरात चर्चा आणि चिंता निर्माण करणारे ठरत आहे. अमेरिकेने इराणला कोणतेही चुकीचे पाऊल न उचलण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे.