डब्ल्यूटीसी फायनल रंगतदार स्थितीत

दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ८ बाद १४४ : २१८ धावांची आघाडी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th June, 12:44 am
डब्ल्यूटीसी फायनल रंगतदार स्थितीत

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रंगदार स्थितीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा १३८ धावांत खुर्दा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही गडगडला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद १४४ धावा केल्या असून त्यांच्याकडे २१८ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाला लवकर बाद करून दक्षिण आफ्रिकेकडे विजयाची संधी आहे. तसेच पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांंची​ कामगिरी पाहता कांंगारू सह​जा सहजी हा सामना हातचा गमावू पाहणार नाही.      

दरम्यान, पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला २१२ धावांवर रोखले. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडवून दिली. २१२ धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण अफ्रिकन संघाला ऑस्ट्रे​लियाने १३८ धावांवर रोखले. तसेच पहिल्या डावात ७४ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपल्याने उर्वरित तीन दिवसात या कसोटीचा निकाल लागणार हे स्पष्ट झाले आहे. 

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २५० हून अधिक धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करणे दक्षिण अफ्रिकेला कठीण जाईल. आता या स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे राहते की दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरते हे सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज फेल गेले. एडन मार्करमला तर खातेही खोलता आले नाही. रायान रिकल्टनने १६ धावा, वियान मुल्डर फक्त ६ धावा करून बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमाने त्यातल्या त्यात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार काही यश आले नाही. त्याने ८४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारून ३६ धावा केल्या. डेविड बेडिंघमने मधल्या फळीत चांगली खेळी केली. एकीकडे विकेट पडत असताना एका बाजूने डाव सावरला. त्याने ४५ धावांची खेळी केली. 

दुसरीकडे, काइल वेरियन्ने १३ धावा, तर मार्को यानसेनला खातेही खोलता आले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये धावचीत होणे हा खरा तर गुन्हा असतो. केशव महाराज मोक्याच्या क्षणी धावचीत होत तंबूत परतला.      

दक्षिण अफ्रिकेकडून पॅट कमिन्सने जबरदस्त गोलंदाजी केली. दक्षिण अफ्रिकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. पॅट कमिन्सने १८.१ षटकात २८ धावा देत ६ गडी बाद केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणार पॅट कमिन्स हा आठवा गोलंदाज ठरला आहे. तर मिचेल स्टार्कने २ आणि जोश हेझलवूडने एक गडी बाद केला.      

पॅट कमिन्सचा विक्रम      

हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी ऐतिहासिक ठरला आहे. या डावात गोलंदाजी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्याने आपल्या ६८ व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे. यादरम्यान त्याने १४ वेळेस ५ एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी ३०० गडी बाद करणारा तो चौथा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. 

लॉर्ड्सवर कर्णधार कमिन्स नंबर वन
कमिन्सने या सामन्यात पहिल्या डावात २८ धावात ६ विकेट्स घेतल्याने तो लॉर्ड्सवर गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणारा कर्णधार ठरला आहे. तसेच लॉर्ड्स क्रिकेट मैदानात कसोटी सामन्यातील एका डावात ६ विकेट्स घेणारा तो दुसराच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कर्णधार म्हणून कसोटी डावात सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करण्याचा विक्रम इंग्लंडच्या बॉब विलिस यांच्या नावावर होता. त्यांनी १९८२ मध्ये भारताविरुद्ध १०१ धावा खर्च करताना ६ विकेट्स घेतल्या होत्या.
लॉर्ड्सवर कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे कर्णधार
६/२८ - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका, २०२५)
६/१०१ - बॉब विलिस (इंग्लंड विरुद्ध भारत, १९८२)
५/३५ - गबी अॅलेन(इंग्लंड विरुद्ध भारत, १९३६)
५/६९ - डॅनिएल ​व्हिटाेरी (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, २००८)

कमिन्सने बुमराहला टाकले मागे
कमिन्सने ६ विकेट्स घेत जसप्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. कमिन्सच्या आता या स्पर्धेत ३४ डावात ७९ विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने २८ डावात ७७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ मिचेल स्टार्क असून त्याने ७४ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात डावात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रमही कमिन्सने केला आहे. तो अंतिम सामन्यात डावात ६ विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज बनला आहे. याआधी २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात काईल जेमिसनने ३१ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या, तर सध्या सुरू असलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात कागिसो रबाडाने ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
१४५ वर्षांच्या कसोटीच्या ​इतिहासात घडला नकोसा विक्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन्ही संघाचे सलामीवीर खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम शून्यावर बाद झाले. इंग्लंडमध्ये १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले की एका कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दोन्ही संघाचे पहिले दोन्ही सलामीवीर खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा २० चेंडू खेळला पण एकही धाव करू शकला नाही, कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तर एडन मार्करमला डावाच्या पहिल्याच षटकात मिशेल स्टार्कने त्रिफळा उडवत तंबूत धाडले.