राज्यात सलग दोन अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन

पहिली स्पर्धा १४ ते २२ जून रोजी पेडे, म्हापसा येथे : दुसरी स्पर्धा २३ ते २८ जून रोजी नावेली येथे

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th June, 12:26 am
राज्यात सलग दोन अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन

पणजी : गोवा लवकरच देशभरातील सर्वोत्तम उप-ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंना एकत्र आणणाऱ्या सलग दोन अखिल भारतीय मानांकन स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेची माहिती गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील आणि सचिव प्रवीण शेनॉय यांनी पत्रकार​ परिषदेत दिली.
पहिली स्पर्धा १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटांमध्ये घेण्यात येणार असून, १४ ते २२ जून या कालावधीत मल्टीपर्पज स्टेडियम, पेडे म्हापसा येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत सुमारे २ हजार खेळाडू सहभागी होणार असून, ही स्पर्धा गुवाहाटी येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी महत्त्वपूर्ण निवड चाचणी ठरणार आहे. या स्पर्धेत सिंगल्स, डबल्स व मिक्स्ड डबल्स अशा १० प्रकारांचे सामने होतील.
या स्पर्धेचे सचिव वेन फर्नांडिस असून स्पर्धा संचालक नवनीत नास्नोडकर व समीर सांगोडकर आहेत. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून मधवन नारायणन (केरळ) यांची, तर उप-पंच म्हणून संपत राव सुरीबाबू (आंध्र प्रदेश) यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची बक्षिसाची एकूण रक्कम १२ लाख रु. आहे.
दुसरी स्पर्धा २३ ते २८ जून रोजी मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली येथे होणार आहे. दुसरी स्पर्धा १३ वर्षांखालील वयोगटासाठी असून, २३ ते २८ जूनदरम्यान मडगावजवळील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली येथे होणार आहे. यात सुमारे ५०० खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत एकूण ६ लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे सचिव कपिल कामत असून स्पर्धा संचालक शर्मद महाजन आहेत. मुख्य पंच म्हणून अनिरुद्ध जोशी (महाराष्ट्र), तर उप-पंच म्हणून एफ. बारिया (गुजरात) काम पाहतील.
स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू : १५ वर्षांखालील मुलगे: पुष्कर साई (कर्नाटक), हर्षित खत्री (दिल्ली), वझीर सिंग (पंजाब), १५ वर्षांखालील मुली: शैना मणिमुथु (कर्नाटक), हंसिनी चदराम (तेलंगणा), अवनी विक्रम गोविंद (तेलंगणा).
१७ वर्षांखालील मुलगे: देव रुपारेलिया (महाराष्ट्र), प्रतीक कौंडिल्य (कर्नाटक), जगशेर सिंग खंगुरा (पंजाब),
१७ वर्षांखालील मुली: लक्ष्य राजेश (कर्नाटक), ऋषिका नंदी (दिल्ली), आधिरा राजकुमार (तमिळनाडू).
गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले, देशभरातून हजारो खेळाडू गोव्यात येणार असून हे सामने अत्यंत रोमांचक ठरणार आहेत. देशात बॅडमिंटनचा स्तर झपाट्याने उंचावला आहे. या स्पर्धांमुळे गोव्यातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
सचिव प्रवीण शेनॉय यांनी सांगितले, आमचे खेळाडू आरुष पावसकर, अद्वैत बालकृष्णन, रितिका चेल्लुरी, सान्वी औदी, शेन डीसोझा, उमर शेख, डिंपल रेवणकर, आर्या मेत्री आणिर् अर्णव सराफ यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
गोवा ठरणार उप-ज्युनिअर बॅडमिंटनचा केंद्रबिंदू
या दोन मोठ्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे गोवा जून महिन्यात उप-ज्युनिअर बॅडमिंटनचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा एक उत्सव ठरणार आहे आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे.