कगिसो रबाडाचे पाच बळी ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१२

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ : दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ४ बाद ४३ धावा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th June, 12:23 am
कगिसो रबाडाचे पाच बळी ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१२

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला आहे. या डावात कगिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी बाद केले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने २२ षटकांत ४ बाद ४३ धावा केल्या होत्या.
या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजाची जोडी मैदानात आली. या जोडीला ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. उस्मान ख्वाजा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कॅमरून ग्रीन अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. कगिसो रबाडाने या दोन्ही फलंदाजांना एकाच षटकात बाद करत माघारी धाडले.
पहिल्यांदाच सलामीला आलेल्या मार्नस लाबुशेनला अवघ्या १७ धावा करता आल्या. या डावात ट्रॅव्हिस हेडही स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला ४ मोठे धक्के बसले. पण दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार कमबॅक केले. ब्यू वेबस्टर आणि स्टिव्ह स्मिथने मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र, एडन मार्करमने स्टिव्ह स्मिथला ६६ धावांवर माघारी धाडत ही भागीदारी तोडली.
ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. त्याला कगिसो रबाडाने बाद करत माघारी धाडले. अॅलेक्स कॅरीने २३ धावांची खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्स १, मिचेल स्टार्क १ आणि नॅथन लायन शून्यावर माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याने १५.४ षटकात ५१ धावा देत करत उस्मान ख्वाजा, कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला बाद केले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचीही सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर एडन मार्करम आपले खातेही न उघडता मिचेश स्टार्कचा बळी ठरला. स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवला. तर दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टनही स्टार्कचाच शिकार ठरला. त्याला वैय​क्तिक १६ धावांवर स्टार्कने ख्वाजा करवी झेलबाद केले. दिवसअखेर द​क्षिण आ​फ्रिकेने ४ बाद ४३ धावा केल्या होत्या. कर्णधार टेम्बा बावुमा ३, तर डेव्हिड बेडिंगहॅम ८ धावांवर मैदानावर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूड आणि कमिन्सने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
सर्वाधिक वेळेस आयसीसीचा अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. दोघांकडे आयसीसीचे ९ अंतिम सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाचा नंबर लागतो. जडेजाकडे आयसीसीचे ८ अंतिम सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या नावे ७ वेळेस आयसीसीचा अंतिम सामना खेळण्याचा रेकॉर्ड आहे. आता या यादीत स्टिव्ह स्मिथने देखील प्रवेश केला आहे.
स्मिथने मोडला सचिनचा विक्रम
या सामन्यात स्मिथने कसोटी कारकिर्दीतील ४२ वे अर्धशतक ठोकले. स्मिथने या अर्धशतकासह आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये सहापेक्षा अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने आपल्या कारकिर्दीत अशा नॉकआउट सामन्यांत ६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. स्मिथने आता ७ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
स्मिथने आणखी एका विभागात नवा टप्पा गाठला आहे. आयसीसीच्या अंतिम फेर सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावांच्या खेळींसाठी त्याने विराट कोहली आणि अॅडम गिलख्रिस्टच्या बरोबरी केली आहे. या तिघांनीही अंतिम सामन्यांमध्ये ३ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत कुमार संगकारा अव्वल स्थानी असून त्याने ४ वेळा ही कामगिरी केली आहे. जर स्मिथ अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात देखील अर्धशतक ठोकण्यात यशस्वी झाला, तर तो संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
ऑस्ट्रेलियाची भारताच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
या सामन्यात मैदानावर पाऊल टाकताच ऑस्ट्रेलिया संघाने भारताच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघ आता संयुक्तपणे सर्वाधिक आयसीसी अंतिम सामना खेळणारा पुरुष संघ बनला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा हा १४ वा अंतिम सामना आहे.
स्टिव्ह स्मिथची रिकी पाँटिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी
अंतिम सामन्यासाठी मैदानात येताच स्टिव्ह स्मिथच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावे सर्वाधिक वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा रेकॉर्ड होता. त्याने ६ वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. आता स्टिव्ह स्मिथ देखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आयसीसीचा सहावा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. महेला जयवर्धने आ​िण कुमार संगकारा यांनी देखील प्रत्येकी सहा अंतिम सामने खेळले आहेत.
ख्वाजाचा नकाेसा विक्रम
कसोटीत सर्वाधिक चेंडूंचा सामना केल्यानंतर शून्यावर बाद होणारा उस्मान हा चौथा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. १८८८ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० चेंडू खेळून ऑस्ट्रेलियाचा सॅमी जोन्स शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. या यादीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे, जो २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध २२ चेंडू खेळूनही आपले खाते उघडू शकला नव्हता. त्याच्या पाठोपाठ माजी क्रिकेटपटू शॉन मार्शचा क्रमांक लागतो. २०१७ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीत २१ चेंडूंचा सामना केल्यानंतर मार्शला शून्यावर बाद झाला. उस्मान संयुक्तपणे आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे. तो दुसऱ्यांदा आयसीसी फायनलमध्ये शून्याचा बळी ठरला. बुमराह, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांनीही अंतिम फेरीत प्रत्येकी दोनदा शून्यावर बाद झाले आहेत.
आयसीसी नॉकआउटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा
विराट कोहली : १० वेळा
स्टीव्ह स्मिथ : ७ वेळा
सचिन तेंडुलकर : ६ वेळा
केन विल्यमसन, जॅक कॅलिस,
कुमार संगकारा : प्रत्येकी ५ वेळा