मंदिर उभारण्यात येणाऱ्या जागेची केली पाहणी
पणजी : महामार्ग रुंदीकरणामुळे पर्वरी येथील खाप्रेश्वर मंदिर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करणे सरकारला भाग पडले. पण, विरोधकांनी त्यावेळी आमच्यावर देवाच्या विरोधात असल्याचे नाहक आरोप केले. नव्या जागेत सरकारच मंदिर बांधून देईल, अशी हमी आपण त्यावेळी दिलेली होती. त्यानुसार या मंदिराचे काम लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकरांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्यासमवेत खाप्रेश्वर मंदिराच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकास्र सोडले. खाप्रेश्वर मंदिर इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही देवाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार विरोधकांनी चालवला. पण, आम्ही नेहमीच देव, देश आणि धर्म म्हणून राजकारण करीत आलो आहे. आम्ही देवाच्या विरोधात कधीही नाही. खाप्रेश्वर मंदिर सरकारच बांधून देईल, अशी हमी आपण स्थानिकांना दिली होती. त्यानुसार मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
दरम्यान, लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि तत्काळ जागा निश्चित करून खाप्रेश्वर मंदिर उभारण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केली. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो, असे मंत्री खंवटे म्हणाले.