संशयितांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
म्हापसा : बस्तोडा येथे चिकन शॉरमा विक्री गाळा चालवणाऱ्या दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही संशयितांना म्हापसा न्यायालयाने अतिरिक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघाही संशयितांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि.११) न्यायालय निकाल देणार आहे.
सोमवारी ९ रोजी म्हापसा पोलिसांनी या प्रकरणातील पिराझोन-मयडे येथील रंगनाथ विश्वनाथ शेट्ये (५५), विनोद नारायण शेट्ये उर्फ शेटकर (४७) व कौशल तुळशीदास शेट्ये (३२) तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना अजून दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दरम्यान, वरील संशयितांनी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी, ९ रोजी या अर्जावर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाला. त्यानुसार न्यायालयाने बुधवारी दि. ११ रोजी पर्यंत निकाल राखून ठेवला आहे. संशयित आरोपी हे तपासकार्यात पाेलिसांना सहकार्य करत नाहीत. हल्ल्यासाठी वापलेले हत्यार हस्तगत करायचे आहे. तसेच इतर संशयित फरार आहेत. त्यामुळे संशयिताचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी विनंती पीडितांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.
दरम्यान, हे प्रकरण गेल्या २ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तार बस्तोडा जंक्शनजवळील मयडे रस्त्यावरील फिर्यादींच्या शॉरमा गाळ्यास्थळी घडला होता. फिर्यादी श्रुती शिरोडकर (नास्नोळा) व त्यांचे पती विवेक शिरोडकर हे यात जखमी झाले होते. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी भा.न्या.सं.मया १२६(२), ३५२, ३५१(३), ११८(२) व ३(५) कलमान्वये अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. शिवाय वरील तिघांना अटक करून त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेल्या दोन कार गाड्या जप्त केल्या होत्या.