गोमेकॉवर रुग्णांचा असलेला भार कमी करण्यासाठी जादा कर्मचारी, जादा तंत्रज्ञ, जादा खाटा, आवश्यक तेवढी यंत्र सामुग्री आणि सर्वांत महत्त्वाचे आवश्यक तेवढे डॉक्टर नियुक्त करणे त्यातही तज्ज्ञ डॉक्टरांना नेमणे हे उपाय आहेत.
आ रोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना कॅमेऱ्यासमोर फैलावर घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. गेले दोन तीन दिवस या विषयावरून सर्वसामान्य जनतेत संमिश्र प्रक्रिया होती. व्हिडिओत मंत्र्यांनी वापरलेल्या भाषेमुळेच लोकांना आक्षेप होता. तीच गोष्ट बंद केबीनमध्ये घडली असती तर यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांसारखीच ही दुर्लक्षित झाली असती. पण कॅमेऱ्यासमोर आणि इस्पितळातील क वर्गातील कर्मचाऱ्यांसमोर एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अत्यंत हीन शब्दांमध्ये खडसावल्यामुळे डॉक्टरांचा स्वाभिमान दुखावला. पण सुरुवातीला डॉक्टरांनीही आक्रमकता दाखवली नव्हती. या घटनेनंतर आयएमएसह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी निषेध करणारे पत्रक जारी केले होते. डॉक्टरांना दिलेली वागणूक कुठल्याच पद्धतीने योग्य नव्हती, असे सर्वांचे म्हणणे होते. तोपर्यंत हे प्रकरण काहीसे 'अळी मिळी गुपचिळी' सारखेच होते. राजकीय विरोधकांनी राणे यांना घेरण्याची संधी सोडली नाही. विरोधक म्हणजे फक्त काँग्रेस आणि आरजीपी. डॉक्टरांना निलंबित करण्याचा आदेश राणे यांनी दिले असले तरी तसा आदेश निघाला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून डॉक्टरांचे निलंबन होणार नाही असे सांगितल्यामुळे हे सगळे प्रकरण मिटण्याच्या रेषेवर होते. अचानक, सोमवारी डॉक्टरांनी संप पुकारून डीन शिवानंद बांदेकर यांनाही मंत्र्यांच्या कृतीचा निषेध करण्यास भाग पाडले. मुख्यमंत्र्यांनी निलंबन होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतरही डॉक्टरांनी संप पुकारून झालेला अपमान भरून काढण्यासाठी मंत्र्यांना गोमेकॉत येऊन माफी मागण्यासाठी बोलावले. गोमेकॉतील व्हीआयपी संस्कृती बंद व्हावी यासाठीही पुढाकार घेतला. व्हिडिओ काढणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मंत्री, आमदारांचे फोन यापुढे घेतले जाऊ नयेत, त्यांच्याकडून वैद्यकीय सेवेत हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी करून डॉक्टरांनी या प्रकरणातून बऱ्याच सुधारणाही करण्याचे प्रयत्न केले. एरवी गोमेकॉ हजारो रुग्णांचा भार सोसण्याच्या पलिकडे असल्यामुळे तिथे मंत्र्यांचा फोन गेल्याशिवाय किंवा तिथल्या कोणाची तरी ओळख काढल्याशिवाय मदत होत नाही, असा गोव्यातील सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. त्यामुळेच लोक आपल्या आमदारांची मदत घेतात. ओळखीच्या डॉक्टरांना सांगतात. आपल्या नात्यातली किंवा जवळची व्यक्ती रुग्ण म्हणून गोमेकॉतील खाटीवर दाखल झाली की त्याच्या कुटुंबियांना मदतीसाठी याचना करण्यापलिकडे काही उपाय नसतो. डॉक्टरांना किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना लोकांची ही भावना कळत नाही आणि लोकांना डॉक्टरांवर असलेल्या हजारो रुग्णांचा भार कळत नाही. दोघांमध्ये होत असलेल्या या गैरसमजाचे रूपांतर मंत्री आमदारांचे फोन येण्यात होते. अनेकदा आरोग्यमंत्र्यांना मेसेज टाकला की प्रतिसाद मिळतो, म्हणून लोक थेट त्यांना फोन करतात. चाळीस आमदारांपैकी दिवसाला एकतरी आमदार गोमेकॉत कोणाच्यातरी मदतीला किंवा त्याची विचारपूस करायला येत असतो. 'व्हीआयपी संस्कृती' इथून सुरू होते.
गोमेकॉवर रुग्णांचा असलेला भार कमी करण्यासाठी जादा कर्मचारी, जादा तंत्रज्ञ, जादा खाटा, आवश्यक तेवढी यंत्र सामुग्री आणि सर्वांत महत्त्वाचे आवश्यक तेवढे डॉक्टर नियुक्त करणे त्यातही तज्ज्ञ डॉक्टरांना नेमणे हे उपाय आहेत. इस्पितळाच्या अनेक वॉर्डांत रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते, हे गोमेकॉचे सत्य इतकी वर्षे दिसूनही त्यात सुधारणा होत नाही. ऑक्सिजनचा सिलिंडर एका रुग्णालाही पुरत नाही, यावर कोणी बोलत नाही. डॉक्टरांनी संपाच्या निमित्ताने 'व्हीआयपी संस्कृती'वर बोट ठेवले तसेच तिथल्या साधन सुविधाही चांगल्या असाव्यात अशी मागणी करायला हवी होती. गोमेकॉत कितीही रुग्ण आले तरी त्यांना हाताळण्याची क्षमता असावी यासाठी मागणी करण्याची हीच नामी संधी होती. किमान या निमित्ताने सरकारने गोमेकॉच्या समस्यांवर लक्ष दिले असते. आरोग्यमंत्र्यांनी जी वागणूक डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना दिली ती आक्षेपार्ह होती हे जेवढे डॉक्टरांनी ठासून सांगितले तेवढीच गरज होती गोमेकॉच्या साधन सुविधांवर विचार करण्याची. डॉक्टर वैतागून काहीवेळा रुग्णांना उलट उत्तरे देत असतील, तर त्याला तिथल्या साधन सुविधाही जबाबदार असू शकतात. तिथल्या गरजा पूर्ण होत नाहीत, दबावही कमी होत नाही त्यामुळे डॉक्टरांनी एखाद्याला इंजेक्शन घेण्यासाठी दुसरा मार्ग सुचवला तर त्याचे एवढे मोठे प्रकरण होऊ शकत नाही, हे जेवढे खरे आहे तेवढेच कुठल्याही रुग्णाला हाताळण्यासाठी तिथे सुविधा, माणसे असणेही तितकेच गरजेचे आहे. सध्या घडलेल्या घटनेचा फायदा गोमेकॉची सद्यस्थिती सुधारण्यासाठी व्हावा, त्यानंतर 'व्हीआयपी संस्कृती'ही आपोआप नियंत्रणात येईल.