पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ज्या ठिकाणी येऊन माझा अपमान केला, त्याच ठिकाणी येऊन पुढील चोवीस तासांत त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपली माफी मागावी. त्यानंतरच आम्ही पुढील कृती ठरवू, असे डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, ज्या बी-१२ इंजेक्शनमुळे हा वाद झाला, ते इंजेक्शन सरकारी आरोग्य केंद्रांतही उपलब्ध असते. ते आपत्कालीन इंजेक्शन नसल्याचे कुट्टीकर यांच्यासह आंदोलन छेडलेल्या इतर डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गोमेकॉत आलेल्या वृद्ध महिलेला इंजेक्शन न दिल्याचा मुद्दा उपस्थित करीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चार दिवसांपूर्वी गोमेकॉत जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेतले. डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या समोर मंत्री राणे यांनी डॉ. कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. शिवाय त्यांना निलंबित करण्याचेही आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांना दिले होते. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मंत्री राणे यांना घेरले. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) आणि इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) कामावर असताना डॉक्टरचा अशाप्रकारे अपमान केल्याबद्दल मंत्री राणे यांच्यावर टीकास्र सोडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७२ तासांत यासंदर्भात कारवाई करावी, अन्यथा देशभर आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘एफएआयएमए’ने दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करीत, डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन करण्यात येणार नाही असे सांगत, रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या गोमेकॉतील डॉक्टरांचे कौतुकही केले.
डॉ. कुट्टीकर यांना सर्वांसमक्ष दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची जाणीव झाल्यानंतर मंत्री राणे यांनी रविवारी रात्री डॉ. कुट्टीकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबांचीही माफी मागितली. सोबतच, रुग्णांबाबत असलेल्या तळमळीतूनच आपण कुट्टीकर यांना बोललो. पण, त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हा वाद पेटलेला असतानाच सोमवारी सकाळी ‘आयएमए’ची गोवा शाखा, गोमेकॉतील विभागप्रमुख, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडत, न्याय देण्याची मागणी बांदेकर यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री राणे यांनी डॉ. कुट्टीकर यांची जाहीर माफी मागावी, डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन करण्यात येऊ नये, गोमेकॉतील रुग्णांच्या विभागात येऊन व्हिडिओ काढण्यास बंदी घालावी, गोमेकॉतील व्हीआयपी संस्कृती बंद करावी, मंत्री राणे आणि डॉ. कुट्टीकर यांच्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्याही आंदोलक डॉक्टरांनी केल्या आहेत.