गोव्यातील पर्यटक टॅक्सी मालकांचा स्पीडो मीटर, सुरक्षा क्रमांकपट्टी आणि आता अॅप अॅग्रिगेटर विरोधात लढा सुरू आहे. त्यातून मोर्चे, आंदोलने झाली. याच आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि टॅक्सी मालक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते योगेश गोवेकर ऊर्फ मोगॅम्बो यांच्याविरुद्ध पोलिसांनी हिस्ट्री शीट उघडल्याने त्याविरुद्ध मोगॅम्बो समर्थक राज्यभरातील टॅक्सीवाल्यांनी हणजूण पोलीस स्थानकावर मोर्चा आणत पोलिसांच्या दडपशाही विरोधात आवाज उठवला. एखाद्यावर उघडलेल्या हिस्ट्री शीटच्या विरुद्ध पोलीस स्थानकावर मोर्चा आणण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना आहे. सरकारने कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून टॅक्सीवाल्यांवर दबाव तंत्र वापरल्यास सदर कारवाईला एकसंध राहूनच लढा देऊ, हे दर्शविण्याचा प्रयत्न टॅक्सीवाल्यांनी मोगॅम्बो प्रकरणावरून केला आहे.
सोशल मीडियामार्फत गोमंतकीय टॅक्सीवाल्यांवर देशी - विदेशी पर्यटकांकडून लूटमारीचे आरोप होऊ लागले. अनेकांनी तर त्यांना टॅक्सी माफिया अशी उपमा दिली. यामुळे सरकारने राज्यात अॅप अॅग्रिगेटर आणण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या योजनेस या टॅक्सीवाल्यांनी प्रखर विरोध केला. मात्र सरकारने ‘गोवा माईल्स’ या अॅप अॅग्रिगेटरला टॅक्सी व्यवसायात उतरवलेच. आतातर अॅप अॅग्रिगेटरची मार्गदर्शक तत्त्वेच जारी केली आहेत.
गोवा माईल्सने व्यवसाय सुरू केल्यापासून त्यांच्या टॅक्सींना अडवणे आणि टॅक्सी चालकांना मारहाण किंवा धमकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडले. या गुन्हेगारी प्रकारामुळे योगेश गोवेकर ऊर्फ मोगॅम्बोसह अनेक स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंद झाले. मोगॅम्बो विरुद्ध २०१९ पासून २०२५ पर्यंत ८ गुन्हे नोंदवले असून त्याच्याविरुद्ध ९ गुन्हे नोंद असल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार हिस्ट्री शीट उघडली गेली आहे. याच कारणास्तव गेल्या २९ मे रोजी हणजूण पोलिसांना टॅक्सीवाल्यांच्या मोर्चाचा सामना करावा लागला.
अनेकांनी निवडणुकीसाठी टॅक्सीवाल्यांचा वापर केला आणि निवडून आल्यानंतर त्यांचा प्रश्न सोडवण्यापेक्षा तो चिघळवण्याचा प्रयत्न केला. आजही किनारपट्टीतील लोकप्रतिनिधी टॅक्सीवाल्यांची फसवणूकच करीत आहेत. यामुळे जुन्या जाणत्या टॅक्सीवाल्यांच्या नेत्यांनी माघार घेतली. त्यानंतर मॉगेम्बोसारख्या युवा टॅक्सी मालकाने अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेची धुरा आपल्या हाती घेतली आणि त्यांनी आपला लढा चालूच ठेवला आहे.
उमेश झर्मेकर