हल्ल्यात १८ जण जखमी, संशयिताला अटक
बर्लिन: जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी एका अज्ञात माथेफिरूने लोकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित महिलेला अटक केली आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जर्मनीच्या बिल्ड वृत्तपत्रानुसार या चाकू हल्ल्यात १८ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्टेशनवरील ट्रॅक १३ आणि १४ दरम्यान प्लॅटफॉर्मवरील लोकांवर हा हल्ला केला आहे. हॅम्बुर्ग शहर हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मानले जाते. तसेच हे स्टेशन स्थानिक, प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाते.
हॅम्बुर्ग स्टेशनवर एका हाय-स्पीड आयसीई ट्रेनमध्ये प्रवासी चढत असतानाच हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर, शुक्रवारी संध्याकाळी स्टेशनवरील चार ट्रॅक बंद करण्यात आले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर हाय अलर्ट जारी केला आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.