सांगोल्डा येथे पोलिसांनी केली होती कारवाई
पणजी : साळगाव पोलिसांनी सांगोल्डा येथे ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई करुन सेल्वीन अॅन्थनी गौंडर (२३, सांगोल्डा) या युवकाला अटक केली होती. संशयित जामिनावर सुटल्यानंतर खटल्याच्या सुनावणीवेळी उपस्थित राहत नसल्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी संशयित सेल्वीन अॅन्थनी गौंडर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
बेलाविस्तावाडा, ट्वेन्टी पॉईन्ट सांगोल्डा येथे सपना राज व्हॅली कॉम्प्लेक्सजवळ ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती साळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, ३ नोव्हेंबर २०२० रोजी उत्तररात्री पोलिसांनी वरील ठिकाणी सापळा रचला. याच दरम्यान पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एक युवक त्या ठिकाणी दुचाकीवरुन त्या ठिकाणी आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. आपण सेल्वीन अॅन्थनी गौंडर (२३, सांगोल्डा) असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, ५ लाख २० हजार रुपये किमतीचा ५ किलो २०० ग्रॅम गांजा त्याच्याकडून जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सेल्वीन गौंडर याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला.
दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण करुन २८ जुलै २०२१ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर वरील प्रकरण प्रथमवर्ग न्यायालयाने २० मे २०२३ रोजी सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. न्यायालयाने १४ जून २०२३ रोजी सुनावणी सुरू केली. याच दरम्यान संशयित न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिला नाही. याची दखल घेऊन न्यायालयाने त्याला अदखलपात्र वाॅरंट जारी केले. यानंतरही न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहिला. दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी संशयिताला अटक करुन न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.
सेल्वीन गौंडर याने न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावेळी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी या बाबींची गंभीर दखल घेत सेल्वीन गौंडर याचा जामीन अर्ज फेटाळला.