एनसीबीची कारवाई : कायतान याला ड्रग्जसह केली होती अटक
पणजी : केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने २०२४ मध्ये आसगाव - बार्देश येथे छापा टाकून सराईत ड्रग्ज तस्कर कायतान फर्नांडिस याला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केली होती. संशयित आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात ड्रग्ज तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय संशयिताला एका प्रकरणात शिक्षाही झाली आहे, असे निरीक्षण नोंदवून म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी कायतान फर्नांडिस याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
एनसीबीच्या गोवा विभागाने ६ जानेवारी २०२४ रोजी सराईत तस्कर कायतान फर्नांडिस याच्या आसगाव - बार्देश येथील घरावर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने कायतान याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे ११६ ग्रॅम चरस आणि २.२३ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली. याच दरम्यान एनसीबीने पुन्हा कायतान याच्या घरावर छापा टाकला असता, त्याचा धाकटा मुलगा मर्विन फर्नांडिस याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम कोकेन आणि १ ग्रॅम चरस जप्त केला. मर्विन यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी कायतान आणि मर्विन या दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने कायतान याला यापूर्वी शिक्षा झाल्यामुळे त्याचा जामीन फेटाळला. तर, मुलगा मर्विन याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. तपास पूर्ण जाल्यानंतर एनसीबीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर कायतान याने पुन्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित कायतान फर्नांडिस याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सरकारी वकिलांचा जामिनास विरोध
न्यायालयात सुनावणी झाली असता, कायतान आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात ड्रग्ज तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय संशयिताला एका प्रकरणात शिक्षाही झाली. तसेच त्याच्या मोठ्या मुलावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्याचा युक्तिवाद एनसीबीचे विशेष सरकारी अभियोक्ता समीर ताळगावकर यांनी केला. त्यांनी जामीन देण्यास विरोध केला.