टॅक्सी चालकांना विश्वासात न घेतल्याचा टॅक्सी मालकांचा आरोप
पणजी : ओला, उबरसारख्या इतर राज्यांतील कंपन्यांना गोव्यात आणून स्थानिक टॅक्सी व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप टॅक्सी मालक संघटनांनी केला आहे. त्यांनी अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांना विरोध नोंदवला आहे. अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांविरोधात पत्र मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन संचालक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी दिली.
सरकारने गोवा परिवहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला असून, हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
सध्या गोव्यात गोवा माईल्स अॅप सेवा सुरू आहे. या अॅपद्वारे टॅक्सी चालक विमानतळ, प्रमुख शहरे तसेच पंचतारांकित हॉटेलांमधील भाडे मिळवतात. मात्र, पेडणे, सत्तरी, सांगे, धारबांदोडा या ग्रामीण भागातील भाडे त्यांना मिळत नाही. का मिळत नाही? कारण त्या भागात भाडे मिळत नाही. या ठिकाणी स्थानिक स्तरावरच एग्रीगेटर सेवा राबवून टॅक्सीची व्यवस्था केली जाते. याबाबत सरकारने विचार करावा, असे संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी सांगितले.
एग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांचा मसुदा सरकारने तयार केला आहे. हा मसुदा तयार करताना सरकारने टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेतले नाही, असेही त्यांनी म्हटले. आजचे सर्वच व्यवसाय गोमंतकीयांच्या हातून सुटले आहेत. बस व्यवसायही आता संकटात आहे. ओला, उबर यांसारखे बाहेरील गोव्यात येऊन टॅक्सी व्यवसाय बळकावण्याचा डाव रचत आहेत, असा आरोप चेतन कामत यांनी केला. सरकार हे गोमंतकीयांचे आहे. त्यामुळे गोमंतकीयांचे हित जपणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. टॅक्सी चालकांनी पर्यटकांची लूट केली, अधिक पैसे घेतले, तर त्याविरोधात तक्रार करण्याची व्यवस्था असावी. यासाठी देखरेख करणारी एखादी यंत्रणा तयार करण्यात काही हरकत नाही, असेही चेतन कामत यांनी सांगितले.
एग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांचा मसुदा तयार करताना टॅक्सी चालकांची मते घेतल्याची माहिती वाहतूक संचालकांनी दिली. मात्र अजूनही टॅक्सी चालकांकडे प्रत्यक्ष जाऊन मते घ्यायला हवीत. प्रस्तावित मसुदा हा टॅक्सी चालकांचा विश्वास संपादन करून तयार केला पाहिजे, असे टॅक्सी संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.
प्रस्तावित मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. आम्ही आमच्या हरकती दिल्या आहेत. एग्रीगेटर अॅप सेवेला विरोध असल्याने योग्य वेळी आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहे, असे बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.