तिबेटमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे

केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळ असल्याची माहिती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd May, 12:18 pm
तिबेटमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे

तिबेट: चीनच्या तिबेट प्रांतामध्ये आज सकाळी भूकंपाचे  धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी नोंदवण्यात आली असून या भूकंपाचे केंद्र नेपाळ सीमेजवळ असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. १६ मे रोजीही सकाळी ६:२९ वाजता चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता अवघ्या ७ दिवसांनी ही घटना घडली आहे. 

प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, बाजारपेठा, आणि रुग्णालयांना अलर्ट रहाण्याचे आदेश दिले असून सकाळपासून काही ठिकाणचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांना सतर्कतेचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं वृत्त सध्या तरी समोर आलेलं नाही.

चीन-नेपाळ सीमावर्ती भाग हा अतिशय संवेदनशील असल्याचे शास्त्रज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खोल होते. त्यामुळे भूगर्भातील हालचालींचा प्रभाव भूपृष्ठावर मोठ्या प्रमाणात जाणवला. तिबेटमधील ल्हासा, शिगात्से, आणि आसपासच्या ग्रामीण भागांमध्येही हे हादरे जाणवले असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे.

हेही वाचा