चिकोळणा-बोगमाळो येथे गुन्हा शाखेने केली होती कारवाई
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने चिकोळणा-बोगमाळो येथे ४३.२० कोटींचे कोकेन जप्त केले होते. या प्रकरणात गुन्हा शाखेने अटक केलेल्या तारिरो ब्राइटमोर मंगवाना या झिम्बाब्वेच्या नागरिकाने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे.
चिकोळणा - बोगमोळो येथे ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, निरीक्षक लक्षी आमोणकर आणि प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रगती मळीक व इतरांनी सोमवार, दि. १४ एप्रिल रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपयांचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. गुन्हा शाखेने प्रथम निबू व्हिन्सेंट याच्यासह मुख्य संशयित रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, रेश्मा वाडेकर ही विदेशात गेल्याची माहिती समोर आली. गुन्हा शाखेने तिची चौकशी केली असता, ती ३१ मार्च रोजी लाओस येथून दिल्ली विमानतळावर उतरली. त्यानंतर ती गोव्यात आल्याची माहिती समोर आली. तिने येताना वरील ड्रग्ज आणल्याची माहिती मिळाली. दरम्यान, गुन्हा शाखेने रेश्माला विदेशात पाठविण्यासाठी प्रवास खर्च आणि व्यवस्था अहमदाबाद - गुजरात येथील चिराग रमेशभाई डुधात याने केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चिराग याची कसून चौकशी केली असता, वडोदरा - गुजरात येथे राहणारा तारिरो ब्राइटमोर मंगवाना या झिम्बाब्वे नागरिकाच्या सूचनेनुसार व्यवस्था केल्याचे समोर आले. याची दखल घेऊन गुन्हा शाखेने संशयित तारिरो ब्राइटमोर मंगवाना या झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
झिम्बाब्वेचा नागरिक तारिरो ब्राइटमोर मंगवाना याने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे.
तारिरोचा ड्रग्ज तस्करीत सहभाग
ड्रग्ज प्रकरणात झिम्बाब्वेचा नागरिक तारिरो ब्राइटमोर मंगवाना याला अटक
चिराग डुधात याच्या माध्यमातून रेश्मा वाडेकरची विदेशात जाण्याची व्यवस्था
तारिरोच्या सूचनेवरून संपूर्ण तस्करीची योजना राबविल्याचा संशय
तारिरो मंगवाना याने मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला