म्हापसा : आंबेखंड वेरे येथे विजेचा धक्का लागून रवी बिरादर (३६, रा. सुकूर पर्वरी) हा युवक ठार झाला. आपल्या आईला तो भेटायला घरी आला असताना ही दुर्घटना घडली.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रवी बिरादर याची वृद्ध आई आंबेखंड वेरे येथे एकटीच राहते. तर रवी पत्नी व दोन मुलांसमवेत सुकूर येथे वास्तव्यास होता. रवी हा आपल्या आईला भेटायला अधूनमधून येत होता. घटनेवेळी तो घरी आला होता. यावेळी घरातील दरवाजाच्या बाजूला पडलेल्या वीज तारांना त्याचा स्पर्श झाला आणि विजेचा धक्का बसला.
मुलगा जमिनीवर कोसळताच त्याच्या आईने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी धाव घेत त्याला १०८ रूग्णवाहिकेतून गोमेकॉत हलविले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलीस उपनिरीक्षक आकाश चोडणकर यांनी दाखल होत पंचनामा केला.