पूर्वमोसमी पावसाचे दिल्लीत थैमान, ६ जणांचा मृत्यू

अशोक नगर रॅपिड रेल मेट्रोच्या शेडचे मोठे नुकसान

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd May, 01:54 pm
पूर्वमोसमी पावसाचे दिल्लीत थैमान, ६ जणांचा मृत्यू

दिल्लीः बुधवारी रात्री वादळासह झालेल्या पावसाने दिल्ली आणि आसपासच्या भागात कहर केला आहे. काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटही झाली. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ६ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती मिळाली आहे. 

रात्रौ उशीरा एका ठिकाणी भिंत कोसळून २ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या ठिकाणी झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, वीजपुरवठा खंडित झाला आहे.

दिल्लीतील गोकुळपुरी परिसरात बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांवर झाड पडल्याची घटना घडली. यात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अझहर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो मौजपूरमधील विजय मोहल्ला येथील रहिवासी आहे. त्याला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. तसेच निजामुद्दीन परिसराजवळील लोधी रोड उड्डाणपुलाजवळ वादळात एक वीज खांब कोसळला. एका अपंग व्यक्तीवर पडल्याची देखील माहिती हाती आली आहे.

दिल्लीतील अशोक नगर रॅपिड रेल मेट्रोच्या शेडचे वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले. शेड कोसळल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये कंत्राटदार प्रभु कुमार (६५) आणि कामगार निरंजन कुमार (४०) आणि रोशन कुमार (३५) यांचा समावेश आहे.

दिल्ली लगतच्या राज्यातही पावसाचा धूमाकूळ
उत्तर प्रदेशातील नोएडामध्येही मान्सूनपूर्व पावसाने अनेक झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त समोर आले आहे. मेरठ, आग्रासह १२ शहरांमध्ये जोरदार वादळासह पाऊस पडला. ११ जिल्ह्यांमध्ये वीज पडून, झाडे आणि भिंती कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका सैनिकाचाही समावेश आहे. आजही राज्यातील ३९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे.

हेही वाचा