हल्लेखोराची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मध्ये दोन इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील ज्यू संग्रहालयाबाहेर हा भीषण गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून, अटकेदरम्यान त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली असल्याचे समजले. ही घटना बुधवारी रात्री सुमारे ९.१५वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात एका पुरुष आणि एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांतील इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
ही घटना लक्ष्य ठरवून केलेल्या हत्येसारखी वाटते. सध्या या घटनेची तपास सुरू आहे आणि लवकरच यासंदर्भात अधिक माहिती शेअर करण्यात येईल, असे अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले
हा गोळीबार म्हणजे ज्यूविरोधी दहशतवादाचे विकृत रूप
वॉशिंग्टन डी.सी. येथील यहूदी संग्रहालयाबाहेर झालेला जीवघेणा गोळीबार हा ज्यूविरोधी दहशतवादाचे विकृत रूप आहे. यहूदी समुदायावर हल्ला करणे म्हणजे एक लालरेषा ओलांडणे आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या गुन्हेगारी कृत्यामागील जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. इस्रायल आपले नागरिक आणि प्रतिनिधी यांचे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संरक्षण करण्यासाठी ठामपणे कार्य करत राहील, असे इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी म्हटले आहे.