२४ साक्षीदारांची साक्ष नोंद : आमिष दाखवून ४.८२ कोटींची फसवणूक
पणजी : क्रिप्टो करन्सी आणि इतर प्रकारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कुडचडे येथील एका कुटुंबाला ४.८२ कोटींचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक तथा प्रतिनिधी सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी यांच्या विरोधात मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १,०६४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात २४ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे.
कुडचडे येथील रुपेश रोहीदास बांदेकर यांनी ईओसीत तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी संशयित सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी या दोघांनी गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक तथा प्रतिनिधी या नात्याने तक्रारदार तसेच त्याच्या कुटुंबीयांना १५ जुलै २०१७ ते १० ऑक्टोबर २०१७ दरम्यान वरील कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. त्यानुसार, प्रथम तक्रारदाराने ७.६६ लाख आणि ४.१० लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्याचा मोबदला म्हणून ६.९ लाख आणि १.२३ लाख रुपये तक्रारदाराला दिले होते. त्यानंतर १९.०६ लाख, ३.६३ लाख रुपये मिळून २२.६९ लाख रुपये गोवा गेम्स ऑनलाईन सर्विसेस प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केली. त्यानंतर तक्रारदाराला cryptocoinshopping.com मध्ये क्रिप्टो चलन मध्ये ५.७५५८३२७ बिटकाॅन्स गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, या गुंतवणूक संदर्भात काहीच मोबदला दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराला सध्याच्या बाजार भावानुसार, ४.६ कोटी रुपये फसवणूक झाली.
एकूण गुंतवणुकीची रक्कम ४ कोटी ८२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारीत केला. निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ईओसीने संशयित सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी या दोघांना अटक केली होती.
दरम्यान, ईओसीने तपास पूर्ण करुन सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी यांच्या विरोधात मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात २४ साक्षीदारांच्या साक्षीसह १,०६४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे.
अजयला जामीन, भौमिकचा अर्ज फेटाळला
अजय दोडामणी याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. तर, सुकांता भौमिक याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर भौमिक याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला आहे.