अपहरण नव्हे, माझी इच्छा होती!

पीडितेच्या जबाबानंतर आरोपीला सशर्त जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd May, 12:05 am
अपहरण नव्हे, माझी इच्छा होती!

पणजी : दक्षिण गोव्यातून १६ वर्षीय मुलीचे ३० एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पीडित मुलीने स्वत: संशयिताबरोबर गेल्याचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिला. २१ वर्षीय संशयित युवक न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच तपास पूर्ण झाला असून पुढील दोन आठवड्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. याची दखल घेऊन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने संशयित युवकाला १० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्या. आश्विन भोबे यांनी दिला आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी २७ एप्रिल रोजी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. मडगाव पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक अनुष्का परब यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३० एप्रिल रोजी कर्नाटकातून मुलीची सुटका केली. त्यावेळी पोलिसांनी मुलीबरोबर असलेल्या २१ वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्यानंतर युवकाला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान मुलीचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नोंद केला.

न्यायालयीन कोठडीत असताना संशयिताने बाल न्यायालयात जामीन अर्ज केला. तो न्यायालयाने ५ मे रोजी फेटाळून लावला. त्यानंतर युवकाने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, युवकातर्फे अॅड. लिओना बॅरेटो यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी पीडित मुलीने न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दिलेल्या जबाबाची माहिती सादर केली. त्यानुसार, मुलीने स्वत: संशयितांबरोबर गेल्याचे मान्य केले आहे. तसेच त्या दोघांमध्ये कोणतेही प्रकारचे शारीरिक संबंध आले नाहीत, असा जबाब नोंद केला. याशिवाय संशयित न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे जामीन मंजूर करण्याचा युक्तिवाद केला.

या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाला १० हजार रुपये, तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाण्यास बंदी तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सरकारी वकिलांचा जामिनाला विरोध

सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे यांनी जामिनाला विरोध करुन मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीला काही अर्थ नाही. याशिवाय युवकाला अटक करतेवेळी मुलगी त्याच्याबरोबर असल्यामुळे अपहरण केल्याचे सिद्ध झाले. याशिवाय गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. संशयित कर्नाटकचा रहिवासी असल्यामुळे त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर तो फरार होण्याची शक्यता असल्याचा दावा केला. 

हेही वाचा