तिघांना अटक : मुलीशी नाते जोडण्याच्या रागातून घडला प्रकार
म्हापसा : कुटुंबातील मुलीसोबत नाते जोडण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्या घरी जाऊन मारहाण करण्याचा प्रकार सांतारशेत हळदोणा येथे घडला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये निकोलेत अल्बुकर्क, केल अल्बुकर्क व नोआह रोचा यांचा समावेश आहे. ही मारहाणीची घटना मंगळवार, दि. २० मे रोजी सकाळी ९.३० ते १.३० या कालावधीत घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पीडित मुलाची संशयितांच्या कुटुंबातील मुलीशी मैत्री होती. ही मैत्री मुलीच्या कुटुंबियांना पसंत नव्हती. त्यामुळे मुलाला जाब विचारण्यासाठी ते त्याच्या घरी आले. त्यांनी आपल्या मुलीसोबत नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी धमकी दिली. नंतर तिघांनीही पीडित युवकाला पकडून लोखंडी सळी व लाथाबु्क्क्यांनी मारहाण केली. तसेच कात्रीच्या सहाय्याने त्याचे केस कापले.
या मारहाणीत पीडित मुलगा जखमी झाला. पीडित मुलाचे पालक त्याच्या मदतीला धावले असता संशयितांनी त्यांनाही धमकावून अडवले. संशयित आरोपी मारहाणीनंतर निघून गेल्यावर पालकांनी जखमी मुलाला इस्पितळात नेले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा पोलिसांनी तक्रार नोंदवून संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम ३३३, ११८(२), १२६(२), ३(५) व गोवा बाल कायदा कलम ८ अन्वये गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याखाली पोलिसांनी वरील तिन्ही संशयितांना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर हे करीत आहेत.