कारखान्याचे अतोनात नुकसान; आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
सोलापूर : येथील एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, कारखान्याचा मालक व त्याचा परिवार आत अडकलेला आहे, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
ही दुर्घटना रात्री सुमारे तीन वाजता अक्कलकोट रोडवरील सेंट्रल इंडस्ट्रीमध्ये घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, ती अत्यंत भीषण होती. आगीने काही वेळातच संपूर्ण कारखाना कवेत घेतला असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
दूर रस्त्यावरूनही आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धूर दिसत होता. प्राथमिक माहितीनुसार, चार जण अद्यापही कारखान्याच्या आत अडकलेले आहेत. त्यात कारखान्याचे मालक व त्यांचा परिवार असल्याचे सांगितले जात आहे. आगीमुळे संपूर्ण परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही. आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क
घटनास्थळी पोलीस दल, वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन यंत्रणा तैनात आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. सेंट्रल इंडस्ट्रीमधील ही दुर्घटना अत्यंत गंभीर असून, कारखान्याचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. घटनास्थळी शोकाकुल वातावरण आहे.