विना पायलट सुमारे १० मिनिटे विमान होते हवेत; मात्र टळला मोठा अनर्थ
फ्रँकफुर्ट : जर्मनीहून स्पेनकडे जाणाऱ्या लुफ्थांसा एअरलाइन्सच्या एका प्रवासी विमानाने तब्बल १० मिनिटे कोणत्याही पायलटशिवाय हवेत उड्डाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अपघात टळल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही घटना १७ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून, नुकतीच ती सार्वजनिक झाली आहे. फ्रँकफुर्टहून सेव्हिले (स्पेन) येथे निघालेल्या या विमानात १९९ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कॉकपिटमध्ये को-पायलट बेशुद्ध
विमानात मुख्य पायलट काही वेळासाठी वॉशरूमला गेला असताना, कॉकपिटमध्ये एकटाच असलेला को-पायलट अचानक बेशुद्ध झाला. त्यामुळे विमान काही वेळेकरिता कोणत्याही नियंत्रकाशिवाय हवेत उडत होते. या काळात विमान कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
पायलटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न निष्फळ
मुख्य पायलट परत आल्यावर त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. डिजिटल कोड वापरूनही दरवाजा उघडला गेला नाही, कारण आतून तो बंद करण्यात आला होता. एका एअर होस्टेसने कॉकपिटमधील को-पायलटशी टेलीफोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी, पायलटने आपत्कालीन कोड टाकून दरवाजा उघडण्याची तयारी केली असताना, बेशुद्ध को-पायलटने थोडी शुद्धीवर आल्यावर दरवाजा उघडला.
विमानाची माद्रिदमध्ये आपत्कालीन लँडिंग
या घटनेनंतर मुख्य पायलटने कोणतीही जोखीम न पत्करता माद्रिदमध्ये आपत्कालीन लँड करण्याचा निर्णय घेतला. को-पायलटला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. विमानातील वॉइस रेकॉर्डरमध्ये काही विचित्र आवाजही नोंदले गेले, जे हेल्थ इमर्जन्सीची स्थिती दर्शवतात, असे अहवालात म्हटले आहे.
लुफ्थांसा कंपनीची प्रतिक्रिया
लुफ्थांसा एअरलाइन्सने या घटनेची दखल घेतली असून, फ्लाइट सेफ्टी विभागाकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. मात्र चौकशीचा तपशील अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे विमान प्रवासातील सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, अशा आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांची तयारी कितपत आहे, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.