वास्को : चिखली येथील टपाल कार्यालयासमोरच्या रस्त्यावर झालेल्या अपघातात म्हापसा येथील शिवदास वेंगुर्लेकर (४५) हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. या प्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास हा आपल्या स्कुटरने कुठ्ठाळीहून वास्कोकडे येत होता. तो चिखली येथील टपाल कार्यालयासमोरच्या रस्त्यावर पोहचला असता, तेथे उभ्या असलेल्या काँक्रिट पंपिंग मशिनला त्याच्या दुचाकीची धडक बसली. सदर पंपिंग मशिन एका टेंपोला जोडण्यात आले होते. टेम्पो तेथे रस्त्याबाजूला उभा करण्यात आला होता. टेम्पो कुठ्ठाळीहून चिखलीकडे जाणार होता. अपघातात शिवदास गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, तथापी तेथे मृत घोषित करण्यात आले. छाती, पोट व मणक्यांना गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्लटो कार्व्हालो पुढील तपास करीत आहेत.