साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

आण्विक प्रकल्पाच्या शक्यतेला पूर्णविराम, एफडीएच्या कारवाईने दुकानदारांमध्ये चलबिचल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th May, 11:14 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : गोव्यात आण्विक प्रकल्प होणार असल्याच्या शक्यतेने निर्माण झालेले वादंग, शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या, आग लागण्याचे प्रकार, अपघात तसेच एफडीएच्या कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणल्याचे प्रकार या आठवड्यात पहाण्यास मिळाले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला हा आढावा.

रविवार 


लईराई देवीच्या धोंडांची नोंदणी होणार 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांना प्राणास मुकावे लागले. अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर देवस्थान समितीने यापुढे लईराई देवीच्या धोंडांनी नोंदणी करावी, अशी नोटीस काढली आहे. दरवर्षी धोंडांमध्ये वाढ होत असते. त्यांना अधिकृत ओळखपत्र व इतर बाबतीत नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.

दोन खांब-धारगळ येथे चार गाड्या एकमेकांवर आदळल्या 

दोन खांब धारगळ येथे सिग्नलजवळ सिग्नल पडल्याने अचानक समोरील गाडीने ब्रेक लावला. यानंतर त्याच्यामागून आलेल्या तीन गाड्यांची ठोकर एकामागून एक बसल्याने चार गाड्यांचे नुकसान झाले. सर्वात जास्त नुकसान टुरिस्ट व्हेईकल गाडीचे झाले. या गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. दोन चारचाकी वाहने तर दोन ट्रक यांच्यात हा अपघात झाला.

सोमवार 

गोव्यात आण्विक वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव 

केंद्रीय वीज आणि गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वीज आणि गृहनिर्माण क्षेत्रातील विकासाबाबत बैठक घेतली. गोव्यात आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली. शक्यता अहवाल तयार झाल्यानंतर राज्याकडून योग्य प्रस्ताव येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोमुनिदाद, अल्वारा जमिनीतील घरे कायम करण्यासाठी नवा कायदा  

कूळ-मुडकांरांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. कोमुनिदाद, अल्वारा जमिनीतील घरे कायदेशीर करता यावीत यासाठी सरकार विशेष कायदा करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. 

मंगळवार 

आठ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’

शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी जबाबदार आठ अधिकाऱ्यांना सरकारने चौकशीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. घटना झाली तेव्हाचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, डिचोली उपजिल्होधिकारी, डिचोली पोलीस उपअधीक्षक, डिचोली मामलेदार, डिचोली पोलीस निरीक्षक, मोपा पोलीस निरीक्षक आणि शिरगाव पंचायत सचिव यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

आण्विक प्रकल्प आणणार नसल्याची ग्वाही

गोवा हा लहान प्रदेश असून आण्विक ऊर्जा प्रकल्पाची गरज नाही. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पाविषयी विचारांचे विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. काँग्रेसवाले लोकांची दिशाभूल आणि खोटा प्रचार करतात, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

बुधवार 

म्हापशात फ्लॅटला आग

कामरखाजन, म्हापसा येथील सतआधार कॉम्प्लेक्समधील खालिद शेख यांच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले. यावेळी शेख कुटुंबीय घराबाहेर गेले होते. दुर्घटनेत घरातील वॉशिंग मशीन, फ्रीज, वीज उपकरणे व इतर वस्तू जळाल्या.

आठ अधिकाऱ्यांची चौकशी गृह खाते करणार

शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी नोटीस जारी केलेल्या आठ अधिकाऱ्यांची चौकशी गृह खाते करणार आहे. हे अधिकारी नोटिसीविषयी गृह खात्याला स्पष्टीकरण देतील, असे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी सांगितले. डिचोली पोलीस स्थानकात नोंद असलेल्या गुन्ह्याविषयी डिचोली पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा आणि डिचोली पोलिसांतील गुन्हा यांचा संबंध नाही, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. 

गुरुवार 

तीन चिकन सेंटर्सना टाळे

अन्न व औषधे प्रशासनाने गृहनिर्माण वसाहत म्हापसा येथील तीन चिकन सेंटर्सना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावून हे स्टॉल्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. एफडीएच्या पथकाने म्हापसा शहर, खोर्ली, गृहनिर्माण वसाहत व तार बस्तोडा या ठिकाणी तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत एकूण १३ आस्थापने तपासण्यात आली. 


जुन्या सरकारी वाहनांचा लिलाव

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कदंबच्या जीर्ण बसेससह इतर खात्यांच्या ११० जुन्या गाड्यांचा लिलाव करून १.२४ कोटी महसूल सरकारी तिजोरीत जमा केला. कदंब वाहतूक महामंडळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, नियोजन आणि सांख्यिकी खाते, वीज खाते, शिक्षण खाते, गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा विधानसभा, सामान्य प्रशासन खाते आणि पोलीस महानिरिक्षकांचे कार्यालय यांच्या ११० जीर्ण वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पर्वरी येथील कदंब महामंडळाच्या डेपोत लिलाव केला. 

शुक्रवार

अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीस जबाबदार ठरवण्यात आलेल्या आयएएस अधिकारी स्नेहा गीते यांच्यासह उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच नेमणूक झालेल्या यशस्वीनी बी. आणि अश्विन चंद्रू या आयएएस अधिकाऱ्यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, नागरी सेवेतील बढत्यांनंतर आयएएसपदी नेमणूक झालेल्या यतींद्र मराळकर आणि संजीव गडकर या दोन अ​धिकाऱ्यांची गोव्यात बदली झाली आहे.

पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

मायना-कुडतरी येथील सां जुझे दी आरियाल परिसरातील सावरीचो दांडो (ओलेमोल) येथे २०२१ साली पत्नीचा खून करणाऱ्या गुलशन तिर्की या कामगारास दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 


उसप येथे चिरेखाणीवर छापा

उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी शुक्रवारी सायंकाळी उसप लाटंबार्से येथे एका चिरेखाणीवर छापा टाकून मशिनरी जप्त केली.  सदर ठिकाणी विनापरवाना खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

४०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त 

केरी येथील तपासणी नाक्यावर नाकाबंदी असताना एका स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ४०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले. पोलिसांनी सदर प्रकरणी कारवाई करून कर्नाटक येथील दोघांना अटक केली असून स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. 

शनिवार

स्कुटरच्या धडकेत महिला जखमी

गावकरवाडा मये डिचोली येथे स्कुटरची धडक बसून देवकी वासुदेव गावकर ही ७५ वर्षीय महिला जखमी झाली. गोमेकॉत तिच्यावर उपचार करण्यात आले. 

एनआयओच्या अहवालाचा म्हादईच्या लढ्यावर परिणाम नाही!

म्हादई जलविवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या अहवालाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगत या अहवालावरील सर्व संभ्रम दूर केले आहेत. 

लक्षवेधी

मधलामाज-मांद्रे येथील रस्त्यालगत असलेले शेकडो वर्षांचे जुनाट आंब्याचे झाड सोमवारी सायंकाळी अचानक कोसळले. या झाडाखाली सापडल्यामुळे दुचाकीस्वार विशाल कृष्णनाथ साळकर (रा. धुळेर, म्हापसा) यांचा मृत्यू झाला. याच झाडाखाली एक चारचाकीही अडकली. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अन्न आणि औषधे प्रशासनाने कळंगुट व काणका येथील प्रत्येकी दोन रेस्टॉरंट्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, एका आस्थापनाला अस्वच्छ जागेत व्यवसाय चालवल्याबद्दल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  

पिर्ण - बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ११.२८ कोटींची फसवणूक झाली होती. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर आणि प्रकाश ए. नाईक या सोसायटीच्या माजी संचालकांना अटक केली आहे. 

हेही वाचा