पहिल्या डावात प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग यांची तुफानी फटकेबाजी
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ४४ वा सामना पावसामुळे वाया गेला. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झाला होता. पण दुसऱ्या डावाची सुरुवात झाली असतानाच पावसाला सुरुवात झाली. बराचवेळ पाऊस झाला. त्यामुळे अखेर रात्री ११ वा. च्या सुमारास हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. यामुळे पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाबने पूर्ण २० षटके फलंदाजी करताना कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण कोलकाता या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकानंतर पावसाचा अडथळा आला. कोलकातामध्ये बराचवेळ पाऊस पडला.
या सामन्यात पंजाबकडून सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी दमदार फलंदाजी करताना अर्धशतके साकारली. याशिवाय त्यांना १२० धावांची सलामी भागीदारीही केली. हे दोघेही सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. तसेच प्रभसिमरनने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्को यान्सन हे स्वस्तात बाद झाले. मॅक्सवेल ७ धावांवर आणि यान्सन ३ धावांवर बाद झाले. पण नंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि जोश इंग्लिसने संघाला २०० धावांपर्यंत पोहचवले. श्रेयसने १६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या, तर इंग्लिसने नाबाद ११ धावा केल्या.
कोलकाताकडून वैभव अरोराने २ विकेट्स घेतल्या, तसेच वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर कोलकाता संघाकडून रेहमनुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन हे सलामीला उतरले होते. पंजाबकडून मार्को यान्सनने गोलंदाजीची सुरुवात केली. पण १ षटकात ७ धावा झाल्या. त्यानंतर पावसामुळे सामना थांबला.
पाँइंट्ल टेबलमध्ये बदल
कोलकाता - पंजाब सामना रद्द झाल्याने मुंबई इंडियन्स ५ क्रमांकावर घसरले आहेत. कारण पंजाब किंग्सचे आता ९ सामन्यांत ११ गुण झाले असल्याने ते आता चौथ्य क्रमांकावर आहेत. १० गुणांवर असलेला मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावरून पाचव्यावर घसरला आहे. पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांचे १२ गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे स्थान निश्चित होत आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचेही १० गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी असल्याने ते सहाव्या क्रमांकावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्सलाही १ गुण मिळाल्याने त्यांचे ७ गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आहेत. ६ गुणांसह सनरायझर्स हैदराबाद ८ व्या क्रमांकावर आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ ४ गुणांसह तळातील अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात पंजाब किंग्जच्या सलामी जोडीने धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने शतकी भागीदारीसह संघाला दमदार सुरुवात करून देताना एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.
या जोडीने ख्रिस गेल आणि केएल राहुल या जोडीने सेट केलेला विक्रम मागे टाकल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता विरुद्ध पंजाबकडून खेळताना सलामीला सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड याआधी ख्रिस गेल आणि केएल राहुलच्या नावे होता. आता हा विक्रम प्रियांश आर्य ६९ (३५) आणि प्रभसिमरन सिंगच्या ८३ (४९) नावे झाला आहे.
प्रियांश-प्रभसिमरनने मोडला केएल राहुल-गेलचा विक्रम
ख्रिस गेल आणि केएल राहुल या जोडीने २०१८ च्या हंगामात पंजाब संघाकडून खेळताना पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली होती. २०२५ च्या हंगामातील ४४ व्या सामन्यात प्रियांश अन् प्रभसिमरन जोडीने १२० धावांची भागीदारी रचत हा विक्रम मोडीत काढला. कोलकाता विरुद्ध कोणत्याही विकेटची ही दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली.
पंजाबचा कोलकाताविरुद्ध भागीदारीचा रेकॉर्ड
वृद्दिमान साहा आणि मनन ओहरा या जोडीने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून सर्वोच्च धावसंख्या केल्याचा रेकॉर्ड आहे. या दोघांनी २०१४ च्या हंगामात बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर या यादीत प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन जोडी १२० धावांच्या भागीदारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी २०१८ च्या हंगामात ईडन गार्डन्सच्या मैदानात पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली होती. गेलशिवाय २०२० च्या हंगामात लोकेश राहुलने मयंक अग्रवालच्या साथीने अबू धाबीच्या मैदानात पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली होती. याच हंगामात शारजहाच्या मैदानात ख्रिस गेलने मनदीप सिंगच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड आहे.
सीएबीकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली
बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी) ने शनिवारी येथे ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल सामन्यापूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आदरांजली वाहिली. सामना सुरू होण्यापूर्वी मृत झालेल्यांच्या स्मरणार्थ एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले. यासोबतच, सामन्यापूर्वी अनेक वर्षांपासून वाजणारी ईडनची पारंपरिक घंटा शनिवारी सन्मान म्हणून वाजवण्यात आली नाही. यावेळी सीएबीचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली, सचिव नरेश ओझा, कोषाध्यक्ष प्रबीर चक्रवर्ती, सहसचिव देवव्रत दास यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचे सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन हे देखील उपस्थित होते.