हैदराबादला धूळ चारत टॉप-३ मध्ये झेप : रोहितचे अर्धशतक
हैदराबाद : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये शानदार पुनरागमन करत विजयाची मालिका कायम ठेवली आहे. बुधवारी झालेल्या ४१ व्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह मुंबईने या हंगामात हैदराबादला दुसऱ्यांदा हरवले आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. हेनरिक क्लासेनने एकाकी झुंज देत ४६ चेंडूत ७१ धावांची खेळी केली, तर अभिनव मनोहरने ४३ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे हैदराबादला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर दीपक चहरने २ आणि हार्दिक पंड्या व आकाश मधवाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
१४४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी संयमी आणि प्रभावी खेळ दाखवला. सलामीवीर रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या बाजूने कॅमेरॉन ग्रीनने नाबाद ४० धावा करत त्याला उत्तम साथ दिली. सूर्यकुमार यादवने १७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई इंडियन्सने केवळ १५.४ षटकांत ३ विकेट्स गमावून १४६ धावांचे लक्ष्य सहजपणे पार केले आणि ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात रोहित शर्मा हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितने मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतर फलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, आज खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादला मागील सामन्यात मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. पण पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला या हंगामात पुन्हा एकदा त्यांच्या खराब फलंदाजीमुळे विजय मिळवता आला नाही. या सामन्यात संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि पॉवरप्लेमध्ये फक्त १३ धावांत ४ विकेट्स गमावल्या. मुंबईकडून, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या जोडीने हैदराबादच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. यामध्ये बोल्टने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या रूपात दोन सर्वात धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
सनरायझर्स हैदराबादला या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे आणि ते गुणतालिकेत आणखी खाली घसरले आहेत. मुंबई इंडियन्सने या सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्लेऑफच्या दिशेने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मुंबईने यासह या हंगामातील एकूण पाचवा, तर सलग चौथा विजय साकारला. तर हैदराबादचा हा एकूण सहावा पराभव ठरला.
मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी
या विजयामुळे मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून ते आता तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी त्यांनी आठ सामन्यांतून ४ विजय मिळवले होते, तर आता नऊ सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात ५ विजय जमा झाले आहेत.
बुमराहचे टी-२० कारकिर्दीत त्रिशतक
जसप्रीत बुमराहने या सामन्यात ४ षटके टाकून १ गडी बाद केला. बुमराहने त्याच्या २३८ व्या टी-२० सामन्यात ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. बुमराहाने भारतासाठी ७० टी-२० सामने खेळले असून त्यात ८९ बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६.२७ आहे. जसप्रीत बुमराह हा टी-२० क्रिकेटमध्ये तिनशे बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या यादीत भुवनेश्वर कुमार आघाडीवर आहे. त्याने ३१८ बळी घेतले आहेत.
इशान किशनचा प्रामाणिकपणा महागात पडला
हैदराबादचा इशान किशन दुसऱ्या षटकात फलंदाजीला आला. तो १ धावेवर फलंदाजी करत होता. २.१ षटकांत, इशान दीपक चहरच्या गोलंदाजीवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला न लागता यष्टिरक्षक रायन रिकेलटनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यानंतर मुंबईच्या कोणत्याच खेळाडूने अपील केले नाही. मात्र, पंचांनी अर्धवट हात वर केल्याचे पाहून, मुंबईच्या खेळाडूंनी अपील केले आणि पंचांनी आऊटचा निर्णय दिला. पण, चेंडूचा इशानच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता. तरी देखील इशान डीआरएस न घेताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा हा प्रामाणिकपणा हैदराबादसाठी महागात पडला.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४३ धावा
मुंबई : १५.४ षटकांत ३ बाद १४६ धावा
सामनावीर : ट्रेन्ट बोल्ड