बंगळुरूचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

११ धावांनी दिली मात : विराट कोहली, पडिक्कलची अर्धशतके, हेजलवूडचे ४ बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 12:39 am
बंगळुरूचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

बंगळुरू : विराट कोहली (७०) आणि देवदत्त पडिक्कल (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या ४२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (आरआर) ला विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र राजस्थानचा संघ २० षटकांत ९ बाद १९४ धावाच करू शकला.
गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल साल्ट आणि विराट कोहलीच्या सलामी जोडीने आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात फिल साल्ट (२६) ला बाद करून वानिंदू हसरंगाने बंगळुरूला पहिला झटका दिला. यानंतर देवदत्त पडिकल फलंदाजीला आला आणि विराट कोहलीसोबत डाव सांभाळला. दोघांनी वेगाने धावा काढल्या. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. १६ व्या षटकात, जोफ्रा आर्चरने विराट कोहलीला बाद करून राजस्थानला दुसरा ब्रेकथ्रू मिळवून दिला.विराट कोहलीने ४२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. पुढच्याच षटकात संदीप शर्माने पडिक्कलला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पडिक्कलने २७ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांसह ५० धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदार (१) चौथा विकेट म्हणून बाद झाला. टिम डेव्हिडने १५ चेंडूत २३ धावा केल्या. तो धावबाद झाला. जितेश शर्माने १० चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून २०५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने दोन, वानिन्दु हसरंगा आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी ४.२ षटकांत ५२ धावांची भागिदारी रचली. मात्र वैभवचा भुवनेश्वर कुमारने त्याच्या वैयक्तीक १६ धावांवर त्रिफळला उडवला. मात्र यशस्वी जैस्वालने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली होती. मात्र तो हेजलवूडचा शिकार ठरला. जैस्वाल १९ चेंडूत ४९ धावा करून बाद झाला. कर्णधार रियान परागने २२ धावांचे योगदान दिले. ध्रुव जुरेल मात्र अखेरपर्यंत मैदानात तग धरून रा​हिला. त्याने ३४ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. हेजलवूडने जितेश शर्माकरवी त्याला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. हेटमायर ११, तर शुभम दुबेने १२ धावांचे योगदान दिले. बंगळुरूतर्फे हेजलवूडने ३३ धावांत ४ गडी बाद केले. कृणाल पांड्याने २ तर भुवनेश्वर कुमार आणि यश दयालने प्रत्येकी १ गडी बाद केला. या विजयानंतर बंगळुरूचे १२ गुण झाले असून बंगळुरू आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचले आहे.
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही विराटची बॅट चांगलीच तळपली. या डावात फलंदाजी करताना त्याने ७० धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमधील मोठ्या रेकॉर्डमध्ये बाबर आझमला मागे सोडले आहे.
धावांचा पाठलाग करताना खेळी कशी सजवायची, हे विराट कोहलीला चांगलच माहित आहे. त्यामुळेच विराट कोहलीला चेजमास्टर म्हटले जाते. मात्र, पहिल्या डावात फलंदाजी करतानाही त्याने अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला. विराटने ३३ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केले. हे विराटने पहिल्या डावात फलंदाजी करताना विराटने झळकावलेले ६२ वे अर्धशतक आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने बाबर आझमला मागे सोडले आहे. बाबर आझमच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करताना ६१ अर्धशतके झळकावण्याची नोंद आहे. तर वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गेलने ५७ अर्धशतके झळकावली आहेत.

बंगळुरु संघाने २० षटकांत फक्त ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी, याच ठिकाणी, म्हणजे बेंगळुरूमध्ये, २०१५ मध्ये आरसीबीने राजस्थानविरुद्ध सात विकेट गमावून २०० धावा केल्या होत्या. तेव्हापासून, आरसीबीने या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आरसीबीने स्वतःचाच १० वर्षे जुना विक्रम गुरुवारी मोडला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन जखमी असल्यामुळे तो अनेक सामन्यांना मुकला आहे. अशा परिस्थितीत, जैस्वालने स्वत: जबाबदारी घेत हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या चार डावांमध्ये ३ अर्धशतके झळकावली आहेत. सॅमसनच्या अनुपस्थितीत संघातील इतर क्रिकेटपटूंना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आधीच सांगितले आहे. राजस्थानचे नेतृत्व सध्या रियान परागकडे आहे. कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसलेल्या परागला अद्याप राजस्थानला फारसा फायदा देता आलेला नाही. 

यशस्वी जैस्वालचा विक्रम
आरसीबीविरुद्ध डावाची सुरुवात करताना जैस्वालने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. आयपीएलच्या इतिहासात तो एकमेव फलंदाज आहे ज्याने डावाच्या पहिल्या चेंडूवर तीन वेळा षटकार मारला आहे. त्याच्यानंतर नमन ओझा, मयंक अग्रवाल, सुनील नारायण, विराट कोहली, रॉबिन उथप्पा, फिल साल्ट, प्रियांश आर्य या सात फलंदाजांनी हे केले आहे. पण त्यांना ही कामगिरी पुन्हा करता आली नाही. तर जयस्वालने ते ३ वेळा केले आहे.
जैस्वालची बटलरशी बरोबरी
आयपीएलमध्ये जैस्वालने आतापर्यंत विरुद्ध हैदराबाद २९, कोलकाता विरुद्ध ४, चेन्नई विरुद्ध ६७, पंजाब विरुद्ध ६, गुजरात विरुद्ध ७५, आरसीबी विरुद्ध ५१, दिल्ली विरुद्ध ७४, लखनौविरुद्ध ४९, आरसीबीविरुद्ध जैस्वालने ४९ धावा करून आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. त्याने ८ डावांमध्ये बटलरने केलेल्या धावांची बरोबरी केली आहे. या यादीत साई सुदर्शन अजूनही अव्वल स्थानावर आहे, ज्याने ४१७ धावा केल्या आहेत. विराट कोहली ९ डावांमध्ये ३९२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने राजस्थानविरुद्ध ७० धावांची खेळी खेळली.
पहिल्या डावात सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे फलंदाज
विराट कोहली- ६२ वेळा
बाबर आझम – ६१ वेळा
ख्रिस गेल – ५७ वेळा
डेव्हिड वॉर्नर – ५५ वेळा
जोस बटलर – ५२ वेळेस
फाफ डू प्लेसिस- ५२ वेळा