मुजरबानीचे नऊ बळी : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-१ अशी आघाडी
ढाका : झिम्बाब्वेने बुधवारी ढाका येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा तीन विकेट्सने पराभव करत तब्बल २०२१ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय नोंदवला. गेल्या चार वर्षांत झिम्बाब्वेला एकाही कसोटी सामन्यात विजयाची चव चाखता आली नव्हती. या ऐतिहासिक विजयात वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने मोलाची भूमिका बजावली. त्याने दोन्ही डावांमध्ये मिळून नऊ विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीची कंबर मोडली.
झिम्बाब्वे सध्या बांगलादेशच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना सिल्हेट येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात मोमिनुल हकच्या अर्धशतकाच्या मदतीने १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने २७३ धावा करत ८२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव २५५ धावांवर आटोपला आणि झिम्बाब्वेला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य मिळाले.
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. त्यांचे महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले, ज्यामुळे संघावर दबाव आला. मात्र, ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. या दोघांच्या संयमी खेळीमुळे झिम्बाब्वेने सात विकेट्स गमावून १७४ धावांचे विजयी लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले आणि सामना आपल्या नावावर केला.
पहिल्याच सामन्यात बांगलादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून झिम्बाब्वेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना २८ एप्रिलपासून चट्टोग्राम येथे खेळला जाईल, ज्यात नजमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मैदानात उतरेल.
ब्लेसिंग मुजरबानी विजयाचा शिल्पकार
या कसोटी विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी ठरला. त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेत त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. २०२१ नंतर झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटी विजय आहे. यापूर्वी त्यांनी घरच्या मैदानावर अफगाणिस्तानला १० विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये त्यांना सातमध्ये पराभव पत्करावा लागला होता, तर दोन सामने अनिर्णित राहिले होते.