मुंबईचा ९ गडी राखून विजय; बुमराहची शानदार गोलंदाजी
मुंबई : रोहित शर्मा पुन्हा एकदा वानखेडेच्या गगनभेदी जल्लोषाचा केंद्रबिंदू ठरला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ९ गडी राखून धुव्वा उडवत प्लेऑफच्या शर्यतीत जोरदार पाऊल टाकले.
वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या या थरारक सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र मुंबईच्या रोहित-सूर्याच्या तुफानी फटकेबाजीपुढे हे लक्ष्य क्षुल्लक ठरले.
मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर सामना अगदी वर्चस्व गाजवत जिंकला. १७७ धावांच्या पाठलागात रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टनने अवघ्या काही ओव्हर्समध्ये ६३ धावांची झंझावाती सलामी दिली. रिकेल्टन २४ धावांवर बाद झाला, पण त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि रोहितने चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरशः जमिनीवर आणले.
रोहित आणि सूर्याने ११४ धावांची नाबाद भागीदारी करत सामना पूर्णतः एकतर्फी केला. सूर्यकुमारने केवळ ३० चेंडूंमध्ये ६८ धावा फटकावल्या, तर रोहितने ४५ चेंडूंत नाबाद ७६ धावांची खेळी साकारली. दोघांनी मिळून १० चौकार आणि ११ षटकारांची आतषबाजी केली.
वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२५ च्या ३८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर जबरदस्त धावसंख्या उभी करत सामन्याच्या रंगतदार नाट्याला सुरुवात केली. टॉस हरल्यानंतर चेन्नईने फलंदाजीची जबाबदारी घेत २० षटकांत ५ बाद १७६ धावा फटकावत सामन्यावर पकड बसवली.
या डावाचा खरा शो स्टॉपर ठरला शिवम दुबे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच त्याने खऱ्या अर्थाने 'दुबेजी मोड' ऑन करत वानखेडेवर चौकार-षटकारांचा धडाका लावला. फक्त ३२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक झळकावले. हे सीझनमधील त्याचे पहिलेच अर्धशतक होते, पण त्याचा परिणाम सीएसकेच्या धावसंख्येवर मोठा पडला.
दुबेसोबतच रवींद्र जडेजानेही आपली शांत पण ठाम शैली दाखवत सीएसकेच्या डावाला स्थैर्य दिले. ३५ चेंडूंमध्ये नाबाद ५३ धावा करत त्याने इनिंगचा शेवट दमदार केला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी झाली जी चेन्नईच्या डावाचा कणा ठरली.
मात्र, जेव्हा डावाच्या सुरुवातीला सीएसकेने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि १७ वर्षीय आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी दिली, तेव्हा अनेकांचे भुवया उंचावल्या. पण या तरुणाने पहिल्याच सामन्यात सगळ्यांची मने जिंकली. अवघ्या १५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि २ षटकार झळकावून त्याने ३२ धावांची झंझावाती खेळी केली. त्याचा आत्मविश्वास वानखेड्याच्या स्टँडमध्ये उसळत्या जल्लोषात स्पष्ट दिसत होता.
दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात सतत बदल करत विविध प्रयोग केले. एकूण ७ गोलंदाज वापरण्यात आले. जसप्रीत बुमराहने ४ षटकांमध्ये केवळ २५ धावा देत २ विकेट घेतले, तर दीपक चाहरने १ विकेट घेतली. मात्र, अश्वनी कुमारने केवळ २ ओव्हरमध्ये ४२ धावा देत सामन्याचा कंट्रोल सीएसकेकडे वळवला. त्याला १ विकेट मिळाली, पण तो मुंबईसाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला.