साप्ताहिकी : आठवड्याभरातील विशेष घडामोडी
पणजी : खून, दरोडा, मारहाण, कोकेनची तस्करी, जमीन हडप, अपघात आदी गुन्हेगारी घटनांनी मागील आठवडा चांगलाच गाजला. एका हॉटेलला भीषण आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. तर सांगेत घराला आग लागून घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीत कपडे, दागिन्यांसह कागदपत्रे जळून खाक झाली. कर्नाटकातील मांस व्यावसायिकाकडून २५ हजार रुपयांचा हप्ता घेताना एसीबीच्या पथकाने कोकण रेल्वे पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक केली. तर भोमवासीय उड्डाणपूल नको, बायपास रस्ताच हवा, या मागणीवर अडून राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी पुन्हा चर्चा करण्याची दर्शविलेली तयारी, या घटना आठवडाभर चर्चेत राहिल्या.
रविवार
श्रवणच्या खुनाचे कारण अस्पष्टच
नगरगाव येथील श्रवण देविदास बर्वे याच्या खुनाचा त्याचे वडील देविदास आणि भाऊ उदय यांनीच कट रचल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. पणजीत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत या खून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. मात्र, खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
वागातोर येथील हॉटेल आगीत भस्मसात, लाखोंचे नुकसान
सोमवार
गोव्यात यंदापासून डीएड अभ्यासक्रम बंद
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) कार्यवाही सुरू झाल्यानंतर यंदापासून डिप्लोमा इन एज्युकेशन (डी. एड्.) हा अभ्यासक्रम बंद झाला आहे. यंदापासून (२०२५-२६) डी.एड्.च्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश देणे बंद झाले आहे.
दोनापावलातील धेम्पोंच्या बंगल्यावर दरोडा
नागाळी-दोनापावल येथील प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश धेंपो (७७) यांच्या बंगल्यावर शनिवारी रात्री काही अज्ञातांनी दरोडा टाकला. जयप्रकाश व त्यांची पत्नी पद्मिनी (७१) यांना दरोडेखोरांनी पलंगाला बांधून घातले होते, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली. यावेळी सोन्याच्या दागिन्यांसह कोट्यवधींचा ऐवज त्यांनी पळवून नेला.
मंगळवार
पोलीस निरीक्षक गुडलरला सात दिवसांची कोठडी
कर्नाटकातील मांस व्यावसायिकाकडून २ लाखांपैकी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन यांना रंगेहाथ अटक केली. त्यांना मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. गुडलर याला तिसऱ्यांदा अटक झाली आहे.
भोमवासीय आक्रमक; पुन्हा चर्चेस मुख्यमंत्री तयार
महामार्गाचे आरेखन पूर्ण झाल्यानंतर भोम येथील ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी आपण आधीच व्यक्त केली होती. या विषयावर भोमवासीयांशी मी चर्चा करण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी सोमवारी चर्चा केल्यानंतर मंगळवारी महामार्गाचे आरेखन करण्यात आले. भोमवासीयांना उड्डाणपूल नको मात्र, बायपास रस्ता हवा आहे, यावरून तिढा कायम आहे.
बुधवार
चिकोळणा येथील कोकेन तस्करी प्रकरणी गुजरातमधील एकाला अटक
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने चिकोळणा-बोगमोळो येथे ४३.२० कोटींचा कोकेन जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हा शाखेने अहमदाबाद-गुजरात येथून संशयित चिराग रमेशभाई डुधात (३२) याला अटक केली आहे.
सत्तरीला वादळी वाऱ्याचा फटका; घरांचे नुकसान
सत्तरी तालुक्याला वादळी वाऱ्याचा मंगळवारी फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान झाले. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
गुरुवारी
सांगेत घराला आग लागून सिलिंडरचा स्फोट
वेळीपवाडा, विळीयण, भाटी-सांगे येथे रोहिदास गावकर यांच्या घराला आग लागून घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत कपडे, सोनसाखळी, कर्णफुले, कागदपत्रे जळून खाक झाली. अंगावरील कपड्यांशिवाय मायलेकीकडे कोणतेही साहित्य शिल्लक राहिले नाही.
मडगावात पूर्ववैमनस्यातून मारहाण, तिघांवर गुन्हा नोंद
मडगाव येथील ओल्ड स्टेशन रोडवर संशयित सुजीत सिंग, दिलीप कुमार व सुनील सिंग (रा. आके, मूळ उत्तरप्रदेश) या तिघांनी तक्रारदार रघुवेंद्र द्विवेदी याला हातोडी व लोखंडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शुक्रवार
जमीन हडप; १००० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडपप्रकरणी व्यावसायिक रोहन हरमलकरच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणी छापा टाकून १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव आणि इतर ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे, तसेच ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे जप्त करून हरमलकर याच्या घराला टाळे ठोकण्यात आले आहे.
चिंबल येथे चिरेखाणीतील स्फोटामुळे ग्रामस्थांत भीती
चिंबल येथील मोरंबी ओ ग्रँड येथील चिरे खाणीत सुरू असलेल्या जिलेटिन स्फोटांमुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनंतर भरारी पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सुरू असलेले काम तातडीने थांबवले.
शनिवार
कांदोळीत रेंट अ कॅबच्या धडकेत ब्रिटिश पर्यटक ठार
कांदोळी येथे देशी पर्यटकाच्या रेंट अ कॅब कारची धडक बसल्याने एका वृद्ध ब्रिटिश पर्यटकाचा मृत्यू झाला. हरीष चुनीलाल सोळंकी (८६) असे मयत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. या घटनेत जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी चंद्रकांता सोळंकी (८१) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी विकी ओमप्रकाश जैन (४८, रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) यास अटक केली आहे.
लक्षवेधी :
* बोंडला प्राणीसंग्रहालयात अस्वलाच्या जोडीसह इतर काही प्राणी आणण्याच्या प्रक्रियेस वन खात्याने गती दिली आहे.
* कर्नाटकातील मांस व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन यांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी रात्री ताब्यात घेतले.
* मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेली ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी काउंटर सेवा आणि गोवा टॅक्सी सेवा मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय जीएमआर कंपनीने घेतला आहे.
* पक्षविरोधी कारवायांत गुंतलेल्या नेत्यांवरील कारवायांस प्रदेश काँग्रेसने सुरुवात केली असून, वादग्रस्त खेमलो सावंत यांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी केली.
* गोवास्थित मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवण्याची अज्ञातांकडून धमकी देण्यात आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. मात्र, तपासणीअंती बॉम्बसदृश कोणतीही स्फोटके आढळून आली नाहीत.
* मडगाव येथील रेल्वेस्थानकावर दिल्ली येथून आलेल्या गाडीतून पार्सलद्वारे आलेल्या मांसासोबत बेकायदेशीररीत्या बीफ आणले जात होते. हा प्रकार हिंदू संघटनांनी उघड केला.
* फातर्पा येथील मंदिराच्या साफसफाईसाठी उंचावर चढलेले डायगो फर्नांडिस (५७) यांचा तोल गेल्याने जमिनीवर पडून मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
* गोव्यात तात्पुरत्या व्हिसावर तीन पाकिस्तानी नागरिक आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.