दिवसाला सरासरी ३२४ रुग्णांनी घेतला सुपर स्पेशालिटी सेवांचा लाभ

आर्थिक सर्व्हेक्षण अहवालची माहिती : वर्षभरात १ लाख १८ हजार ३३८ रुग्णांवर उपचार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 12:01 am
दिवसाला सरासरी ३२४ रुग्णांनी घेतला सुपर स्पेशालिटी सेवांचा लाभ

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी वैद्यकीय विभागातील सेवा सामान्य रुग्णांसाठी फायेशीरच ठरत आहेत.
राज्यात मागील वर्षात १ लाख १८ हजार ३३८ रुग्णांनी या विभागातील विविध सेवांचा लाभ घेतला आहे. याचाच अर्थ महिन्याला ९८६१ तर दिवसाला सरासरी ३२४ रुग्णांनी या विभागातील सेवा घेतल्या आहेत. आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०२४-२५ मधून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार सुपर स्पेशालिटी सेवांमध्ये प्रामुख्याने कार्डीओलॉजी( हृदयाशी संबंधित) युरॉलॉजी (किडनी व अन्य) नेफ्रोलॉजी (किडनी), न्यूरोलॉजी (मज्जासंस्था), न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी , ओंकॉलॉजी ( कर्करोग संबधित),एंडोक्राइनोलॉजी (हार्मोन्स), पेडीयाट्रिक सर्जरी ( लहान मुलांवरील शस्त्रक्रिया), सीव्हीटीएस , आयव्हीएफ व अन्य सेवांचा समावेश आहे. लाभ घेतलेल्या एकूण रुग्णांपैकी १६ हजार ४३० रुग्ण हे गोमेकॉ इस्पितळात भरती झालेले होते. तर उर्वरित १ लाख १ हजार ९०८ हे बाह्य रुग्ण (ओपीडी) होते.
अहवालानुसार एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक २९ हजार ८१६ रुग्णांनी कार्डीओलॉजी विभागातील सेवा घेतल्या होत्या. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ८१ रुग्णांनी याचा लाभ घेतला. १९ हजार ४३६ रुग्णांनी नेफ्रोलॉजी विभागातील सेवा घेतल्या. १८ हजार ३७१ रुग्णांनी वैद्यकीय ओंकॉलॉजी विभागातील सेवा घेतल्या. १५ हजार ८९६ रुग्णांनी वैद्यकीय युरॉलॉजी विभागातील सेवा घेतल्या. २० हजार २७२ रुग्णांनी न्यूरोलॉजी व न्यूरो सर्जरी या विभागातील सेवा घेतल्या होत्या. तर ८ हजार हून अधिक रुग्णांनी प्लास्टिक सर्जरी विभागातील सेवा घेतल्या.
वंध्यत्वासाठी २६४५ जणांनी घेतले उपचार
अहवालानुसार वरील कालावधीत २६४५ जणांनी वंध्यत्वासाठी उपचार घेतले आहेत. यासाठी सुपर स्पेशालिटीतील असिस्टेड रीप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) विभागात आयव्हीएफ सह अन्य उपचार पद्धतीचा वापर करण्यात येतो. तर ३५५४ लहान रुग्णांवर पेडीयाट्रिक सर्जरी विभागात उपचार करण्यात आले.