काजूच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांनी घट शक्य

शेतकरी चिंतेत : कृषी संचालनालयाकडूनही उत्पादनात घट झाल्याचे मान्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 11:58 pm
काजूच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांनी घट शक्य

पणजी : यंदाच्या वर्षी काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत फक्त ५० ते ६० टक्केच उत्पन्न मिळाले आहे. काजूचा हंगाम सुरू झाला असला तरी बहुतांश भागांतील झाडांवर फळे लागणे थांबले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी संचालनालयानेही उत्पादनात घट झाल्याचे मान्य केले असून, काही दिवसांत याचे अधिक स्पष्ट चित्र मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.
या वर्षी काजूचा हंगाम उशिरा सुरू झाला. वाऱ्यामुळे फुले गळून पडल्यामुळे हंगाम लांबला. परिणामी, काजूचे उत्पन्न समाधानकारक मिळाले नाही. मागील चार वर्षांपासूनच काजू उत्पादनात घट होत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदाही त्याच पद्धतीने फटका बसला असून, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पारंपरिक आणि कलम केलेल्या झाडांवर एकाच वेळी फळे आल्यामुळे उत्पादनात घट झाली. साधारणपणे काजूचा हंगाम ३ ते ५ महिने चालतो. मात्र यंदा फक्त एका महिन्यातच फळे आल्यामुळे हंगाम अपुरा ठरला. हंगाम मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेपर्यंत असतो. परंतु यंदा एकाच वेळी सगळे पीक आल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. फळे लहान राहिली आणि प्रमाणही कमी राहिले. आजही ५० टक्के पीक तयार झालेले नाही, असे सत्तरीतील शेतकरी रणजित राणे म्हणाले.
काजू बोंंडे लहान असल्यामुळे रस निघण्याचे प्रमाणही कमी आहे. अनेक ठिकाणी काजूच्या बोंडांना फळ लागलेले नाही, तर काही ठिकाणी बिया काळ्या पडल्या आहेत, त्यांचा आकारही लहान आहे. दमट हवामानामुळेही काजू पिकाला फटका बसला असून, साधारणतः ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे राणे यांनी नमूद केले.
तापमान वाढीचा परिणाम
काही भागांत काजू लागले असले तरी, अंदाजे ५० ते ५५ टक्के इतकी उत्पादनात घट झाली आहे. काजूचा हंगाम पुढील एक महिना म्हणजे १५ मेपर्यंत चालेल. मात्र सध्याच्या परिस्थितीकडे पाहता पुढे फारसे उत्पादन मिळेल अशी शक्यता कमी असल्याचे कुंकळ्ळीचे काजू बागायतदार सत्यवान देसाई यांनी सांगितले. तापमानात वाढ झाल्यामुळे काजूच्या परागण प्रक्रियेवर परिणाम झाला असून, त्यामुळे फळे धरलेली नाहीत. हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे त्याचा परिपाक फळे न लागण्यात झाला. कलम केलेल्या झाडांवर पीक कमी आले असले तरी पारंपरिक झाडांवर मात्र उत्पन्न तुलनेत चांगलं मिळाले आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केल.



यंदा काजूचे उत्पादन तुलनेत कमी आहे. पुढील १०-१५ दिवसांत एकूण किती उत्पादन मिळाले हे स्पष्ट होईल.
संदीप फळदेसाई, कृषी संचालक