लघुपटातल्या स्त्रीच्या बाबतीत भौतिक प्रवाहाबरोबर हा आतला प्रवास घडतो आणि ती मुक्कामी पोहचते. हे सहजपणे घडत नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ही ज्येष्ठ स्त्री एकटी कशी राहणार याविषयी चर्चा होत असते आणि त्यात ती सोडून इतर सगळेच आपापली मते हिरीरीने मांडत असतात!
‘‘तुला राग आला, चिडचिड झाली की काही बोलू नकोस... सरळ उठून फिरून ये...” गेल्या महिन्यात माझी काही कारणावरून सतत चिडचिड होत होती, तेव्हा मला मैत्रीण सांगत होती. चिडचिड होत असताना किंवा कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला की त्या वातावरणातून बाहेर गेल्यावर राग शांत होतो, विचार स्पष्ट होतात हा अनुभव यापूर्वीही मी घेतला आहे त्यामुळे ती म्हणतेय ते मला पटलेच. वातावरण बदल हा एकूणच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही अतिशय गरजेचा असतो हे वेगळे लिहायची गरजच नाही. रडणाऱ्या लहान बाळाला एका खोलीतून बाहेर नेले, तरी ते शांत होते. शारीरिक व्याधी असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारच्या वातावरण बदलावामुळे तरतरी येते, ते उपचारांना अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला लागतात आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठी तर तो अत्यावशकच! म्हणूनच तर अनेकदा रोजच्या आयुष्यात थकून गेलेल्या लोकांना, “जरा कुठेतरी फिरून या…” असा सल्ला दिला जातो.
पर्यटन हा त्याचाच पुढचा भाग. नवीन ठिकाणे, नवीन संस्कृती बघणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊन बघणे या गोष्टी पर्यटनादरम्यान होत असतात. या गोष्टींमुळे म्हणजेच, रोजच्या जगण्यात झालेल्या बदलांमुळे येणारी तरतरी सगळा थकवा दूर करते.
असे हे पर्यटन या ना त्या प्रकारे आपण वर्षभर करत असतोच. शहरांतील लोकांना या बदलाचे महत्त्व जास्त पटले असल्यामुळे त्यांच्या लेखी पर्यटनाला जास्त महत्त्व आहे. ऑफिसमधूनदेखील अशा प्रकारच्या प्रवासाला खास सुट्टी, सवलत मिळते. पगारामधली काही रक्कमसुद्धा पर्यटनासाठी राखीव असते पण खेड्यांत मात्र चित्र जरासे वेगळे आहे. नात्यातल्या लोकांकडे जाणे, लग्नकार्यानिमित्त चार दिवस बाहेरगावी राहून येणे, उन्हाळ्यात कुणाकडे जाऊन येणे यापेक्षा फारसे वेगळे काहीच केले जात नाही. पर्यटन म्हणजे एकप्रकारे चैनच. ग्रामीण आणि शहरी भागातले ताण तणाव वेगवेगळे असतात त्यामुळे अशी थेट तुलना करणे योग्य नाही, तरीही गेल्या महिन्यात ऐकलेली एक गोष्ट विसरणे मला शक्य होत नाही.
खेडेगावातल्या काही ज्येष्ठ बायका, फिरायची आवड असलेल्य. घरगुती, मुलाबाळांच्या जबाबदारीतून मोकळ्या झाल्यावर फिरायला प्राधान्य देणाऱ्या. गाव सोडून कधी फारशा बाहेर न राहतासुद्धा, धीराने एकट्या प्रवास करणाऱ्या या स्त्रीया म्हणजे खरेतर कौतुकास पात्र आणि इतरांसाठी आदर्श. पण त्यांच्या या आवडीला कमी लेखून आणि त्यांच्या आवडीमुळे, हाऊसमुळे त्यांच्या घरच्या माणसांची होणारी जराशी गैरसोय अधोरेखित करून चर्चा घडताना बघितले आणि मनातून खचून गेले.
घरातल्या पुरुषांना बाहेरून आल्यावर त्रास होऊ नये हा विचार करून बायकांनी फिरायला जायचे नाही हा विचार आजही बायकांना चुकीचा वाटत नसे, तर ही गोष्ट गंभीरच म्हणावी लागेल. फिरायची मक्तेदारी एकतर पुरुषांची, स्त्रियांना फिरायचे असेल तर नवऱ्याबरोबर किंवा मुलाबाळांबरोबर त्यांनी फिरायला जावे हा नियम कुणी आणि कधी लावला? याचा दोष पुरुषांच्या माथी देण्यापेक्षा याची जबाबदारी बायकांनी घेतली आणि हा नियम बदलायला सुरुवात केली तर? असा विचार गेला महिनाभर डोक्यात येत होता. मान्य, सगळ्या काही धीट नसतात. पण एकमेकींची निंदा न करता एकमेकींना घेऊन पुढे जाणे तर शक्य आहेच ना? हा विचारही अधूनमधून सुरूच होता. ‘चाय-कॉफी’ नावाचा एक लघुपट बघितला आणि लक्षात आले, की कुणाला असे काही सांगून पटणार नाही. हा प्रवास प्रत्येकीच्या बाबतीत आतून घडायला हवा. तसा तो घडला नाही तर या भौतिक प्रवासाचे तरी काय महत्त्व? लोक काय म्हणतील? हा दुय्यम प्रश्न मागे टाकून आपल्याला काय हवे आहे या प्रश्नाला जास्त महत्त्व द्यायला शिकणे ही काळाची गरज आहे. जगाला हो म्हणताना आपण स्वतःला नाही म्हणत नाहीये ना? हा विचार प्रत्येक व्यक्तीने करायला हवा नाही का?
लघुपटातल्या स्त्रीच्या बाबतीत भौतिक प्रवाहाबरोबर हा आतला प्रवास घडतो आणि ती मुक्कामी पोहचते. हे सहजपणे घडत नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ही ज्येष्ठ स्त्री एकटी कशी राहणार याविषयी चर्चा होत असते आणि त्यात ती सोडून इतर सगळेच आपापली मते हिरीरीने मांडत असतात! अशातच काही माहीत नसताना, काहीच अनुभव नसताना ही स्त्री पर्यटनासाठी निघते... लांब, अशा ठिकाणी जिथे तिच्या नवऱ्याने तिला कधीतरी घेऊन जायची इच्छा व्यक्त केलेली असते. या प्रवासात तिला अनेक अडचणी येतातच. ती त्याने खचून न जाण्याच्या प्रयत्नांत असताना तिला मुलाचा फोन येतो, लोकांच्या बोलण्याचा दोष तिच्या माथी मारणारा. यानंतर मात्र ती खचून जाते. साहजिकच आहे. नवरा गेल्यानंतर ती कुठे राहणार? कशी राहणार याबद्दल होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्याचासुद्धा तिचा अधिकार आहे हेच ज्या लोकांना पटत नसते त्यांना तिचे हे फिरायला जाणे समजणे शक्य आहे का?
या प्रवासादरम्यान तिला साथ मिळते ती एका छोट्या मुलीची. सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने सुरुवात होऊनसुद्धा नंतर तिला ती मुलगी बरेच काही सांगून, शिकवून जाते. त्यांच्यातल्या मैत्रीची चित्रीकरण फार सुंदर केले आहे. घरातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला झालेला गोंधळ, मुलाच्या फोन आल्यावर रडण्यापासून ते त्याला उत्तर देण्यापर्यंतचा प्रवासदेखील इतका सुंदर आहे. या दोन्ही भौतिक आणि भावनिक प्रवासाच्या अंतिम टप्यावर पोहचल्यावर लघुपटात एक किंचितसा, काहीसा मजेशीर विरोधाभास दिसून येतो. अवघ्या काही क्षणांची ही फ्रेम या लघुपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते... खरा प्रवास कोणता होता यावर विचार करायला लावणारा हा शेवट मला जास्त भावला...आपण नेहमी म्हणतो की, 'The journey is always more beautiful than the destination.’ पण याबाबतीत 'The destination is the most beuatiful part of this journey...’ असे म्हणावेसे वाटले.
मुग्धा मणेरीकर, फोंडा