नाद झंकार निनादतो…

नाद म्हणजे श्रवणसुख देणारा ध्वनी. जे ऐकून कान अगदी तृप्त झाले असं वाटायला लावणारा आवाज. संगीत साधनेत आवाजाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. रियाज करून गाणे शिकता येईल पण सुरेल आवाज ही एक निसर्गदत्त देणगी असते.

Story: मनातलं |
12th April, 04:19 am
नाद झंकार निनादतो…

हल्लीच आमच्या घराच्या वरांड्यात लावलेले विंड चाईम आजकाल जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहे. त्याचे कारण त्याचा उठणारा नाद हा अत्यंत मधुर कानांना सुखवणारा असा असल्याने साहजिकच काय वाजतेय हे बघायला लोक उत्सुक असतात. विंड चाईम म्हणजे पवन झंकार. वाऱ्यावरती डोलणारे, किणकीण आवाज करणारे हे शोभेचे एक ताल वाद्य यंत्र. जे घराबाहेर, खिडकीवर, दारावर, गॅलरीत, बाल्कनीत घराच्या बागेत कुठेही टांगता येतं. छोट्या छोट्या घंटेच्या किंवा धातूच्या, काचेच्या, लाकडाच्या उभ्या नळयांचा वापर करून एक आकार तयार करतात जे वाऱ्याच्या हलक्याश्या झुळकीनेही एकमेकांवर आपटतात आणि त्यातून नाद निर्माण होतो. तो आवाज सुमधुर असतो. शिवाय जपानी फेंगशूईनुसार यातून निर्माण होणाऱ्या लहरी या सकारात्मकता पसरवणाऱ्या असतात. या आवाजाने घरात पॉझिटिव्हिटी वाढते. जे आजकालच्या धकाधकीच्या आणि यांत्रिक युगात फारच गरजेचे आहे. जपानी संस्कृतीत हे ध्वनीचे प्रतिकात्मक रूप आहे. त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे घरात येऊ पाहणारी नकारात्मकता परतून लावत सकारात्मक ऊर्जा वाढीस लावायचे काम करते. त्या नाद मधुर लहरींमुळे मनात आणि घरात सुख, शांती, समाधान येते. 

 आपण मंदिरात जातो तेव्हा मुख्य द्वाराजवळच घंटा टांगलेली दिसते  जेणे करून आत येणारा आधी घंटा वाजवून नाद निर्माण करतो त्याचा उद्देश ही हाच असावा की त्या घंटानादामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात ध्वनीची नादमधुर स्पंदने उमटावी, त्यामुळे आपल्या मनात एक पवित्र भावना, मंगल विचार आणि भक्ती यांची त्रयी निर्माण होऊन देवदर्शन सुखदायी मनाला शांती देणारे ठरावे. आरतीच्या वेळी या घंटेच्या नादात, तालासुरात आरती म्हटली जाते त्यामुळे ती कानाला गोड वाटते. मंदिरात आल्या आल्या घंटा वाजवून कदाचित भक्त देवाला सांगू पाहतो “मी आलोय बरका तुझ्या दर्शनाला” म्हणजे देवाला तुम्ही आल्याची वर्दी देणारी ही घंटा असते. हल्ली घराच्या दारावर या घंटेची फारच गरज असते कोणीतरी आलंय याची सूचना या घंटीच्या नादामुळे आपल्याला होते. नाद जेव्हा सुरेल असतो तेव्हा तो ऐकावासा वाटतो नाहीतर कधी एकदा बंद होतो असं वाटतं. चर्चमधली घंटा काही अशुभ झालं की वाजते तेव्हा तो नाद ऐकावासा वाटत नाही. फायर फायटर घंटा वाजवत येते तेव्हा तो आवाज मन कातर करतो. आवाज किंवा नाद यामुळे आपल्या मनातल्या भावना बदलताना दिसतात. अशुभ वेळी होणारा सायरनचा नाद नको वाटतो. गायकांच्या बाबतीत आवाजाला फारच महत्त्व असते. सुरात गाणं म्हणणं आणि आवाज चांगला लागणं या गोष्टींकडे बारकाईने पहातात. सुर ऐकणारे आपले कान चांगले स्वर उचलून धरतात गायकाला वाहवा मिळवून देतात. कारण तो नाद सुखावह असतो. संध्याकाळच्या वेळी गाईगुरे घराकडे निघाल्या की त्यांच्या गळ्यातल्या घुंघरांची किणकिण ऐकायला चांगली वाटते. युरोपमध्ये हिरव्यागार कुरणात चरणारी धष्टपुष्ट गुरे आपल्या गळ्यातल्या घंटेचा नाद करत इकडून तिकडे फिरत असतात त्याची आठवण होते. एखाद्या गायकाने घेतलेली तान किंवा लकेर नादब्रम्हाचे स्वरूप वाटते. जन्माला आल्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आईच्या कानावर पडतो तो नाद किती सुखद आणि अनमोल असतो तिच्यासाठी तो रडण्याचा आवाजसुद्धा कानाला गोडवा देणारा ठरतो. वसंतातले कोकीळ कुजन असो की बोलणारा पोपट किंवा हल्लीच प्रसिद्ध झालेला कावळा असो त्यांच्या बोलाचा नाद ऐकायला सगळेच उत्सुक असतात. पहाटेच्या वेळी किंवा सणासुदीला सनई वादनाने मनात मंगल भावनांचे तरंग उठतात.

 नाद दोन प्रकारचा असतो एक आहत नाद आणि दुसरा अनाहत नाद. आहत नाद ऐकायला नकोसा वाटणारा कर्कश तर अनाहत नाद हा जो ऐकू येत नाही पण जाणवतो असा अदृश्य स्वरूपातला नाद. मंजुळ बासरीचा नाद कानावर पडतो तेव्हा आपण श्री कृष्णाच्या मुरली वादनाशी एकरूप होऊन जातो जणू कान्हा आपल्या जवळच कुठेतरी बसून पावा वाजवतोय. काही जणांच्या मोबाईलची रिंगटोन ही कधी कधी खूप सुमधुर असते ऐकतच रहावीशी वाटणारी तर काही जणांची कर्ण कर्कश शांतता भेदून जाणारी असते. नाद म्हणजे श्रवणसुख देणारा ध्वनी. जे ऐकून कान अगदी तृप्त झाले असं वाटायला लावणारा आवाज. संगीत साधनेत आवाजाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. रियाज करून गाणे शिकता येईल पण सुरेल आवाज ही एक निसर्गदत्त देणगी असते.

  निसर्गातही अनेक आवाज निर्माण होत असतात जसे समुद्राची गाज, लाटांचा आवाज घनघोर जंगलात झाडांच्या सळसळीचा आवाज, बांबूच्या वनातली शीळ, वाऱ्याचा आवाज, ढगांचा गडगडाट, वीजांचे कडकडणे, पावसाची रिपरिप, वाहत्या पाण्याचा खळखळाट अशा विविध आवाजांमधून निसर्ग आपल्याशी जणू बोलत असतो. कोंबड्याचं आरवणं, भारद्वाजचा घू घू, मोराचा केकारव, पक्ष्यांची किलबिल, असा निसर्ग अनुभवायचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात रहाणं गरजेचं असतं. त्याच्याशी आपली नाळ जोडली गेली पाहिजे. असा नादाचा आणि आपल्या शरीराचा ही संबंध जोडलेला असतो बालपणी आईचे अंगाई गीत ऐकत आपण सुखाने झोपी जातो. काही आजारावर सुरेल संगीत ऐकणं हा इलाज असतो मनाला शांती देणारा नाद हा उपचाराचे काम करतो. ज्यायोगे आपण स्वस्थ आणि शांत रहायचा प्रयत्न करतो. एखादे चांगले गाणे कानावर पडले की दिवसभर त्या गाण्याच्या ओळी मनात गुंजारव करत आपल्याला प्रसन्न ठेवतात. 

नाद जेव्हा झंकार करत निनादत असतो तेव्हा तो मनाला सुकून देणारा, मनाच्या तारा छेडणारा वाटतो पण कधी कधी बेसुर आवाज, कानाला कानठळी बसवणाऱ्या लाऊड स्पीकर्सचा वापर, मोठमोठ्याने बडवले जाणारे ढोल-ताशे लहान बाळांना वृद्ध आजारी माणसांना त्रासदायक ठरू शकतात. त्यात जरी नाचायला लावणारा ताल असला तरी त्यातून बसणारे हादरे, कंपने ही इतरांसाठी वाईट परिणाम करणारी ठरतात. सणावाराला दिवाळी, गणपती, होळी या वेळी शरीरात जोष आणण्यासाठी जरी अशा वाद्यांचा जोरजोरात ठणाणा करत असले तरी तरुण पिढीला ते  सहन होण्यासारखे असते बाकीच्यांना मात्र त्या आवाजाचा त्रासच होतो. याचा विचार करूनच काय ते केलेले बरे.


प्रतिभा कारंजकर, फोंडा