दृष्टिकोनापासून विजयापर्यंत : क्षयरोगाविरुद्धच्या लढाईला नवीन स्वरूप

Story: प्रासंगिक |
24th March, 09:21 pm
दृष्टिकोनापासून विजयापर्यंत : क्षयरोगाविरुद्धच्या लढाईला नवीन स्वरूप

या जागतिक क्षयरोग दिनी, क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत भारत आपल्या रणनीतीची कशी पुनर्रचना करत आहे, यावर मी मोठ्या अभिमानाने विचार करतो. नुकत्याच संपलेल्या १०० दिवसांच्या सघन क्षयरोगमुक्त भारत मोहिमेने केवळ नाविन्यपूर्णतेची शक्तीच दाखवून दिली नाही तर समुदायांना एकत्रित करणे हे कार्यक्रमात्मक दृष्टिकोन बदलण्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे देखील दाखवून दिले आहे. क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध वेगवान करणे, मृत्युदर कमी करणे तसेच नवीन रुग्णप्रसार रोखणे, या उद्देशाने ७ डिसेंबर २०२४ रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली.

१०० दिवसांच्या या मोहिमेत क्षयरोगाचे लवकर निदान होण्यासाठी अत्याधुनिक धोरणे सादर झाली, ज्यामुळे लक्षणे नसलेल्या लोकांनाही ओळखले जाऊन त्यांच्यावर उपचार करता आले. पोर्टेबल एक्स-रे मशीन उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींकडे थेट नेण्यात आल्या, ज्यात मधुमेह असलेले लोक, धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे, एचआयव्ही ग्रस्त लोक, वृद्ध आणि क्षयरोगाच्या रुग्णांच्या घरगुती संपर्कांचा समावेश होता. कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या एक्स-रेने संभाव्य क्षयरोग प्रकरणे त्वरित ओळखली आणि गोल्ड-स्टँडर्ड न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (एनएएटी) वापरून त्यांची पुष्टी केली. या प्रयत्नांमुळे रुग्णांवर लवकर उपचार झाले, ज्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखला गेला. क्षयरोगाचा उच्च धोका असलेल्या देशभरातील २.९७ कोटी लोकांची तपासणी झाली. यामुळे ७.१९ लाख क्षयरोग रुग्णांची ओळख पटवण्यात आली, त्यापैकी २.८५ लाख रुग्ण लक्षणे नसलेले होते आणि या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाशिवाय ते राहून गेले असते, ज्यामुळे क्षयरोगाच्या संक्रमणाची साखळी खंडित झाली. हा फक्त एक मैलाचा दगड नाही - हे एक महत्त्वपूर्ण वळण आहे.

क्षयरोग निर्मूलन ही आता लोकसहभागाने चालणारी लोकचळवळ आहे. संपूर्ण भारतात १३.४६ लाखांहून अधिक निक्षय शिबिरे घेण्यात आली, जिथे खासदार, आमदार आणि पंचायती राज संस्था तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसह ३० हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींनी या मोहिमेला पाठिंबा दिला. कॉर्पोरेट भागीदार आणि सामान्य नागरिक या मोहिमेत सामील झाले. या अभियानात लोकांच्या सहभागाची उदाहरणे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिसून आली जिथे संबंधित २२ मंत्रालयांनी क्षयरोग जागरूकता, पोषण किट वितरण, क्षयरोग मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेणे इत्यादी ३५ हजारांहून अधिक उपक्रम राबवले. त्याचप्रमाणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने २१ हजारांहून अधिक उपक्रम आयोजित करण्यात आले आणि ७८ हजार शैक्षणिक संस्थांमध्ये ७.७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी क्षयरोग जागरूकता आणि संवेदनशीलता उपक्रमांमध्ये भाग घेतला. कारागृहे, खाणी, चहाचे मळे, बांधकाम स्थळे आणि कामाची ठिकाणे अशा समूहबद्ध ठिकाणी ४.१७ लाखांहून अधिक असुरक्षित लोकसंख्येची तपासणी आणि चाचणी करण्यात आली. मोहिमेच्या काळात २१ हजारांहून अधिक क्षयरोग जागरूकता उपक्रम राबविण्यात आले, ज्यात धार्मिक नेत्यांचा आणि समुदायातील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असलेल्या उत्सवांशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश होता. 

आपल्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने, ज्याने लोकसहभागाचा पाया घातला, केवळ पोषणासाठीच नव्हे तर मानसिक आणि व्यावसायिक समर्थनासाठी रुग्णांना दत्तक घेण्यासाठी व्यापक सामाजिक समर्थन मिळविले. क्षयरोग रुग्णांना मिळणारी मदत घरे, गावे आणि कामाच्या ठिकाणी देखील होत आहे. निक्षय मित्र उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्ती आणि संस्था क्षयरोगाने ग्रस्त कुटुंबांना पोषण आहार पुरवत आहेत, हजारो पोषण किट आधीच वितरित केले गेले आहेत. फक्त १०० दिवसांत १,०५,१८१ नवीन निक्षय मित्रांची नोंदणी झाली. पोषण आणि क्षयरोगापासून मुक्तता यातील महत्त्वाचा संबंध ओळखून सरकारने निक्षय पोषण योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत ₹ ५०० वरून ₹ १००० प्रति महिना अशी वाढवली आहे, जेणेकरून कोणताही क्षयरोगी ही लढाई लढताना एकटा पडू नये.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विभेदित क्षयरोग काळजी कार्यक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांसाठी अनुकूलित आणि व्यक्तिगत उपचार देखील प्रदान करत आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या क्षयरोग रुग्णाचे वजन कमी आढळले, तर त्यांचे आरोग्यसेवा प्रदाते त्यांच्यासाठी एक अनुकूलित पोषण आणि उपचार योजना तयार करतात आणि उपचारादरम्यान त्यांच्या प्रगतीचे दरमहा निरीक्षण करतात.

क्षयरोग जागरूकता आणि सेवेचा दैनंदिन जीवनात समावेश करण्यासाठी २२ मंत्रालयांनी एकत्र काम केले. गोवा कार्निव्हल परेडचे आकर्षण म्हणजे क्षयरोग जागरूकता चित्ररथ होते. देशभरातील शाळांमधील सकाळच्या सभांमध्ये क्षयरोग जागरूकता संदेशांचा समावेश करण्यात आला. लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने हजारो अभ्यागतांना मोफत क्षयरोग तपासणी करण्यासाठी त्यांच्या समूह कार्यालयांच्या जाळ्याचा वापर केला. या विविध प्रयत्नांमुळे कलंक दूर झाला, चुकीची माहिती दुरुस्त झाली आणि क्षयरोग निर्मूलन सार्वजनिक जाणीवेच्या केंद्रस्थानी आले.

१०० दिवसांची मोहीम ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येकाला आधुनिक निदान, दर्जेदार उपचार, अखंड सामुदायिक समर्थन मिळावे, यासाठी देशभरात या प्रयत्नांना गती देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे. ज्याप्रमाणे भारताने कोविड-१९ चाचणी वेगाने वाढवली, त्याचप्रमाणे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पुढील पिढीतील क्षयरोग निदानात गुंतवणूक करत आहे, जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंतच्या रुग्णांची जलद आणि अधिक अचूक चाचणी करता येईल. भारत फक्त क्षयरोगाशी लढत नाहीये - आपण त्याला हरवत आहोत.


- जगत प्रकाश नड्डा

(केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री)