गोवा शॅक मालक संघटनेची मागणी
पत्रकार परिषदेत बोलताना गोवा शॅक्स मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज. सोबत संघटनेचे पदाधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ज्यांनी परप्रांतीयांना शॅक चालवण्यासाठी दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. ज्यांनी आपले शॅक गोमंतकीयांना चालवण्यासाठी दिले आहेत, त्यांना कारवाईतून वगळा, अशी मागणी गोवा शॅक्स मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी केली. या मागणीचे निवेदन लवकरच पर्यटन संचालकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्यांना चालवण्यासाठी दिलेल्या शॅक्सवर कारवाईची मोहीम पर्यटन खात्याने हाती घेतली आहे. याअंतर्गत ११० शॅक्स मालकांना नोटीस बजावली होती. यापैकी २३ शॅक्स बंद करून ते हटवण्याचे आदेश पर्यटन खात्याने दिले आहेत. यापैकी ६ शॅक्स परप्रांतीय चालवत होते. या कारवाईविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शॅक्स परप्रांतियांना चालवण्यासाठी देण्याला आमचा विरोध आहे; परंतु शॅक्स गोमंतकीयांना चालवण्यासाठी देण्याची सरकारने परवानगी द्यावी. शॅक व्यवसाय गोमंतकीयांकडे राहावा, असे सरकारचे धोरण आहे. शॅक लॉटरी पद्धतीने वाटप करण्याच्या प्रक्रियेत ६५ वर्षांवरील व्यक्ती भाग घेऊ शकत नाही. या पारंपरिक व्यावसायिकांकडे आम्ही माणुसकीच्या नात्याने शॅक सोपवले आहेत. सरकारने याबाबत विचार करावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
शॅक इतरांना चालवण्यासाठी देणे हे बेकायदेशीर आहे. नियमभंग होत असल्याने कारवाई सुरू केली आहे. शॅक व्यावसायिकांच्या मागणीबाबत सरकार निर्णय घेईल. पुढील शॅक धोरणात त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल.
_ केदार नाईक, संचालक, पर्यटन