म्हापसा पालिकेतील फाईल्स गहाळ

उपसभापतींकडून चौकशीसाठी पोलिसांत तक्रार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd March, 12:17 am
म्हापसा पालिकेतील फाईल्स गहाळ


म्हापसा :
येथील नगरपालिकेमधील लोकांच्या फाईल्स गहाळ होत आहेत. तसेच हजेरीपटामध्ये फेरफार केला जात असून या प्रकरणाची सखोल व सविस्तर चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली आहे.
शुक्रवारी दि. २१ रोजी नगरपालिका कार्यालयात लोकांच्या समस्या जाणून घेताना उपसभापती जोशुआ डिसोझा यांना अनेकांनी आपल्या फाईल्स गहाळ झाल्याचे सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांनी देखील संबंधितांच्या फाईल्स मिळत नाहीत, असे चौकशीवेळी सांगितले. यापूर्वीही सुमारे २० जणांनी हा प्रकार उपसभापतींच्या निदर्शनास आणून दिला होता.
फाईल्स पालिकेतून गायब होण्याच्या या प्रकाराची उपसभापतींनी गंभीर दखल घेत संबंधित कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची खरडपट्टी काढली. असे बेजबाबदार प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, अशा सज्जड इशारा त्यांना दिला.
यावेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून हजेरीपटात देखील फेरफार केला जातो आणि गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची ते हजर असल्याचा शेरा हजेरीपटात मारला जातो. हा देखील प्रकार उपसभापती डिसोझा यांच्या निदर्शनास आला.
म्हापसा पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांना बोलावून माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर व नगरसेवक हजर होते. त्यानंतर याप्रकरणी आपण स्वत:हून पोलीस तक्रार करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला. त्यानुसार सांयकाळी त्यांनी लिखित तक्रार पोलिसांत दाखल केली. पालिकेतून फाईल्स गहाळ होणे व हजेरीपटात होणाऱ्या फेरफारची सविस्तर चौकशी करावी, अशी सूचना उपसभापतींनी पोलिसांना केली आहे.
गहाळ झालेल्या फाईल्सपैकी दोन फाईल या दोघा नगरसेवकांनीच नेल्याचे उपसभापतींच्या निदर्शनास यावेळी आले.

फाईल्सना फुटतात पाय...
म्हापसा पालिकेच्या कार्यालयीन कामकाजातील प्रमुख असे मुख्य कारकूनपद रद्द झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभाराचा कसलाच ताळमेळ नाही. पालिकेत इन्व्हर्ट होणारी फाईल कुणा डिलिंग हॅण्डकडे दिली व तिथून पुढे कुठे गेली याचा ठावठिकाणा कुणालाच नसतो. फाईल्स इन्व्हर्ट होतात. मात्र पुन्हा सापडतच नाहीत. लोकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते. या फाईल्स सापडतच नाहीत, असा सावळागोंधळ पालिकेत चालला आहे.          

हेही वाचा