गुन्हेवार्ता : मार्रा- पिळर्ण दरोडा प्रकरण : पर्वरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला छडा

आतापर्यंत पाच जणांना अटक, अन्य तिघांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
गुन्हेवार्ता : मार्रा- पिळर्ण दरोडा प्रकरण : पर्वरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला छडा

पणजी : मार्रा- पिळर्ण येथे बिस्वास दाम्पत्याला सुऱ्याचा धाक दाखवून घरात २४ लाखांचा दरोडा घातल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांकडून दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक. संशयितांमध्ये जॉयसी ऊर्फ प्रिया डिसोझा (मार्रा), कल्पना बर्की (बस्तोडा), इम्रान शेख (बस्तोडा), सुभाष कुमार (कोलवाळ), धीरज गुप्ता (कोलवाळ) यांचा समावेश.

काय आहे नेमके प्रकरण ? 

१७ मार्च रोजी पहाटे ३.३० रोजी ५ जणांनी मार्रा- पिळर्ण येथे पप्पू बिस्वास आणि त्यांची पत्नी वास्तव्यास असलेल्या भाड्याच्या खोलीवर सशस्त्र दरोडा घातला. खोलीचे दायर तोडून त्यांनी आत प्रवेश केला. पुढे त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत  बिस्वास दाम्पत्याकडून १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ९ लाख रुपये रोकड उकळली. 

पप्पू बिस्वास यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. भा. न्या.सं. च्या ३१०(२),१२७ कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी सुमारे १० पथके स्थापन करत तपासचक्रे गतिमान केली. तांत्रिक बाबी आणि सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पाचही जणांची ओळख पटवण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर षड्यंत्र रचून दरोडा टाकल्याच्या ठपका ठेवत त्यांना रीतसर अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या एका धक्कादायक माहितीनुसार, जॉयसी ऊर्फ प्रिया डिसोझा (मार्रा) ही महिला बिस्वास दाम्पत्याच्या घराशेजारी राहते. या दाम्पत्याकडे पैसे आणि दागिने असल्याची कल्पना तिला होती. या कुटुंबियासमवेत तिचे वागणे देखील चांगले होते. दरम्यान तिनेच याची माहिती तिच्या साथीदारांना पुरवली. योजना आखल्यानंतर, या कटास मुर्तस्वरूप देण्यात आले. दरोडा टाकल्यानंतर पाचही जणांनी कळंगुटच्या एका हॉटेलमध्ये एकूण मुद्देमालाची समान वाटणी केली. या पाच जणां व्यतिरिक्त या प्रकरणात अन्य तिघांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.  आणि हे तिघे सराईत गुन्हेगार आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली.   या टोळीतील उर्वरित तीन सदस्यांच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. 

दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला ( दार तोडण्यासाठी ) लोखंडाचा रॉड हस्तगत केला असून, लुटीतील मुद्देमाल देखील काही अंशी जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक (गुन्हे) राहुल गुप्ता आणि पर्वरी पोलीस उप अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा