पालकांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने सुनावणी ढकलली पुढे
पणजी : नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करीत पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी याचिकादारांनी वेळ मागितल्याने सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. यामुळे नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार की नाही, यावर आता पुढील सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
इयत्ता सहावीपासूनचे नवे शैक्षणिक वर्ष येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयाला विविध भागांतील पालकांकडून विरोध होत आहे. या पालकांनी आपापल्या आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडेही १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करू नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे काही आमदारांकडूनही या निर्णयाला विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.
परंतु, पालक आपल्या स्वार्थासाठी या निर्णयाला विरोध करीत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १ एप्रिलपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे काही पालकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालय आता सोमवारी सुनावणी घेणार आहे. या सुनावणीनंतरच नवे वर्ष कधीपासून सुरू होणार, हे निश्चित होणार आहे.