विदर्भ : नागपुरात औरंगजेबचा पुतळा जाळल्याने उफाळली दंगल : उपायुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला

५५ हून अधिक जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; वातावरण अजूनही तणावग्रस्त. शहरात बीएनएसचे कलम १६३ लागू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th March, 09:43 am
विदर्भ : नागपुरात औरंगजेबचा पुतळा जाळल्याने  उफाळली दंगल : उपायुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला

नागपूर : औरंगजेबची कबर हटवण्याच्या मुद्यावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी एकमेकांना शिंगावर घेतले खरे, पण यात सामान्य जनता नाहक भरडली गेल्याचे दृश्य काल नागपुरात दिसून आले. औरंगजेब कबर वादामुळे सोमवारी महाराष्ट्रातील हिंदू संघटनांनी राज्यभर निदर्शने केली. यादरम्यान, विश्व हिंदू परिषदेने  नागपूरमध्ये औरंगजेबाचा पुतळा जाळला. त्यात कथितपणे आक्षेपार्ह साहित्य वापरण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोमवारी रात्री ८:३० वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली.


१० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे.


उपायुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला

दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनाला आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि ५५ हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान शहरात बीएनएसचे कलम १६३ (आयपीसीच्या कलम १४४ प्रमाणे) लागू करण्यात आले आहे. त्याच वेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी २० पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली. 



दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेश भाजप अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर बावनकुळे नागपूरला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.जिल्ह्यात एक कंपनी आणि एसआरपीएफच्या दोन प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत. 


परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.


दरम्यान दंगलखोरांनी त्यांचे चेहरे झाकले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्या हातात तलवारी, काठ्या आणि बाटल्या होत्या. अचानक सर्वांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. घरांवर दगडफेक करायला सुरुवात केली. दुकानांची तोडफोड करण्यात आली. यानंतर त्यांनी वाहनांच्या खिडक्या फोडण्यास सुरुवात केली आणि त्यांना आग लावली.



मुंबईतील मुस्लिमबहुल भागात सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे.

हिंसाचारानंतर शहरातील गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. मालवणी, भिंडी बाजार, कुर्ला, शिवाजी नगर-मानखुर्द आणि अँटोप हिल यासारख्या मुस्लिमबहुल भागात स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. मुंबई पोलिसांनी विविध क्षेत्रातील सर्व धर्मांच्या प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.



मुळात संपूर्ण वाद महाराष्ट्रातील सपाचे आमदार अबू आझमी यांच्या विधानाने सुरू झाला. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली. मी त्याला क्रूर शासक मानत नाही. जर कोणी म्हणत असेल की ही लढाई हिंदू आणि मुस्लिमांबद्दल होती, तर मी त्यावर विश्वास ठेवत नाही, असे विधान ३ मार्च रोजी त्यांनी केले.  


Days after praising Aurangzeb, Abu Azmi pays tribute to Sambhaji Maharaj


यानंतर चहूबाजूंनी आझमी  यांच्यावर टीकेची राळ उठली. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. वाद वाढत असताना, आझमी यांनी ४ मार्च रोजी आपले विधान मागे घेतले. या घटनेला आज १३ दिवस झाले असून राजकीय मायलेज घेण्यासाठी अनेक नेते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. मात्र याचा फटका सामान्य जनतेला बसत असल्याचे दृश्य आहे. 


Maharashtra: VHP, Bajrang Dal threaten Babri Masjid-like action on  Aurangzeb tomb in Chhatrapati Sambhajinagar, later call off protest - India  Today


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा