सोशल : सचिन-सीमाच्या घरी हलला पाळणा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th March, 12:42 pm
सोशल : सचिन-सीमाच्या घरी हलला पाळणा

नोएडा : प्रेमासाठी काहीही म्हटत सीमा ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा आई बनली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता नोएडातील कृष्णा रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. हे तिचे पाचवे मूल आहे. यापूर्वी तिला तिच्या पाकिस्तानी पतीपासून चार मुले होती. सीमा आणि सचिनच्या संसारवेलीवर फुललेले हे पहिलेच फुल आहे.  

मुलगी भारतात जन्मली आहे, त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपल्या संविधानात जन्माने मिळालेल्या नागरिकत्वाला प्राधान्य देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, तिला आपोआप भारतीय नागरिक मानले जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील इरफान फिरदौस म्हणाले. 

सीमाने २०१४ साली गुलाम हैदरशी लग्न केले.  २०१९ मध्ये, गुलाम हैदर सीमा आणि चार मुलांना कराचीत सोडून दुबईला गेला. २०१९ मध्येच, PUBG खेळत असताना, सीमाची नोएडातील रबुपुरा येथील रहिवासी सचिन मीनाशी ऑनलाइन भेट झाली. १० मार्च २०२३ रोजी सीमा आणि सचिन नेपाळमध्ये प्रत्यक्षात भेटले. यानंतर त्यांनी लग्न केल्याचा दावा सीमाने केला. नेपाळहून सीमा पुन्हा पाकिस्तानला गेली. सचिन नोएडाला आला.

१३ मे २०२३  रोजी सीमा पुन्हा पाकिस्तानहून दुबईमार्गे नेपाळला आली आणि राबुपुरा येथे पोहोचण्यासाठी नेपाळहून बसने प्रवास केला. १ जुलै रोजी सचिन आणि सीमा यांनी त्यांचे भारतीय ओळखपत्र बनवण्यासाठी बुलंदशहरमधील एका वकिलाची भेट घेतली. वकिलाने पोलिसांना सीमा पाकिस्तानी असल्याची माहिती दिल्यानंतर एकूण प्रकरण समोर आले.

त्यानंतर दोघेही घरातून पळून गेले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. ३ जुलै रोजी सीमा-सचिन यांना हरियाणातील बल्लभगड येथून ताब्यात घेण्यात आले. ४ जुलै २०२३ रोजी पोलिसांनी सचिनचे वडील नेत्र पाल यांना अटक केली. ८ जुलै रोजी तिघांनाही कोर्टाकडून जामीन मिळाला. १७ आणि १८ जुलै रोजी एटीएसने सीमा आणि सचिनची चौकशी केली. २१ जुलै रोजी सीमा आणि सचिनच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले.

२१ जुलै रोजी सीमाने भारतीय नागरिकत्वासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. २३ जुलै रोजी, बुलंदशहरमध्ये सचिनच्या चुलत भावाची चौकशी केल्यानंतर, अहमदगढमधील दोन तरुणांना ताब्यात घेत नंतर अटक करण्यात आली. एकूणच या सर्व प्रसंगावर सोशल मिडियावर बरीच चर्चा रंगली. मिम्सचा तर पाऊस पडला.  प्रसारमाध्यमांनी अनेक महीने यावर बातम्या देऊन बक्कळ टीआरपी कमावला. आता पुन्हा सोशल मिडियावर मिम्सचे वारे घोंघावू लागले आहे. 

हेही वाचा