वन्यजीव संरक्षण व विकासकामे यात संतुलन अपेक्षित

अस्वलाचा व्हिडिओ पाहता जांभळीकडून वाळपईला येणाऱ्या मार्गासाठीही वन्यजीव मंडळाने जांभळीकडे ते वाळपई वनक्षेत्रातून प्रवास करणाऱ्या वाहतुकीसाठी वेळेचे बंधन घालावे. असे केल्यास वन्यजीव संरक्षण व विकासकामे या दोन घटकांमध्ये संतुलन राखणे शक्य होईल.

Story: साद निसर्गाची |
11 hours ago
वन्यजीव संरक्षण  व विकासकामे यात संतुलन अपेक्षित

एक अस्वल घाबरे-घुबरे होऊन जीवाच्या आकांताने धावत असतानाचा व्हिडिओ दोन आठवड्यांपासून सामाजिक माध्यमावर बराच गाजत आहे. हेडलाईट आणि होर्नच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारातून मार्ग काढणारी चारचाकी व आपल्या अधिवासात प्रवेश केल्यामुळे भीतीने प्राण वाचवण्यासाठी पळत सुटलेले अस्वल असे दृश्य दाखवणारा तो व्हिडिओ. या व्हिडिओ नंतर दोन-चार दिवसांनी त्याच जंगल भागात रात्रीच्या वेळी एक अस्वल रागाच्या भरात गाडीवर हल्ला करतानाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला. दोन्ही व्हिडिओमध्ये दिसणारा मार्ग कोणता तर जंगल चिरुन चोर्लामार्गे जांभळीकडून वाळपईला जाण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेला मार्ग! दोन्ही व्हिडिओमधील अस्वल एकच होते का हा जरी संशोधनाचा विषय असला तरी वनक्षेत्रातून होऊ घातलेला नवनिर्मित रस्ता येथील वन्य प्राण्यांसाठी अडचणीचा ठरतोय हे मात्र नक्की. 

गोव्याचे म्हादई वनक्षेत्र हे झाडे-झुडपे-वन्यप्राण्यांनी सुसज्ज असे वनक्षेत्र. हा दाट जंगली भाग कित्येक प्राण्यांचा अधिवास. इतर जंगलांप्रमाणे हेही जंगल मातीची सुपीकता टिकवणे, भुगर्भातील पाण्याचे स्त्रोत जिवंत ठेवणे, हवेतील कार्बनडायॉक्साईड शोषून  प्राणवायूचे प्रमाण वाढवणे (हवा शुद्ध करणे), प्राण्यांचा अधिवास टिकवून ठेवणे, यासारखी कार्ये करते. या क्षेत्रातून होऊ घातलेल्या रस्त्यामुळे प्राण्यांचा अधिवास विभागला गेलाय हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. पण त्याचबरोबरच, अंतर कमी झाल्याने वाळपई ते बेळगाव मार्गे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा रस्ता सोयीस्कर झाला आहे हेही तितकंच खरं आहे.

अस्वलाने रागाच्या भरात किंवा घाबरून चारचाकीवर घेतलेली झडप दोन गोष्टींकडे इशारा करते; एक म्हणजे वन्यजीवाच्या अधिवासात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका व दुसरी म्हणजे या भागातून प्रवास करत असताना वन्य प्राण्यांमुळे माणसाच्या जीवावर बेतू शकणारे संकट. वन्यजीव संरक्षणाबद्दल उभा ठाकलेला प्रश्न व या मार्गामुळे वाळपई ते बेळगाव पर्यंतचे कमी झालेले अंतर पाहता विकासकामे व वन्यजीव संरक्षण या दोन्ही बाबी लक्षात घेत हा विषय संवेदनशीलपणे सोडवण्याची गरज भासते.

ठाणे पंचायत क्षेत्रातून पालीमार्गे जांभळीकडे (चोर्लाघाट) जाणारा हा रस्ता बेळगाव-वाळपईचे अंतर जवळ जवळ ३५ किलोमीटरने कमी करतो. ह्या मार्गामुळे वाळपई ते बेळगावचा प्रवास दीडेक तासांनी कमी होतो. वन्य क्षेत्रामधून जाणारा हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी जरी प्रतिबंधित केलेला असला तरी एरवी होत असलेल्या वाहतुकीमुळेही वन्यजीवांवर घोंगावणारा धोका टळणे अवघडच आहे. 

ह्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने राज्याच्या हद्दीतील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी काढलेला उपाय प्रशंसनीय वाटला. खानापूर आणि अनमोड दरम्यानचा मानतुर्गा मार्ग हा सिंधानूरू-हेम्मदगा राज्य महामार्ग-३० चा एक भाग. हा महामार्ग बेळगावी जिल्ह्यातील भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातून आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील काली व्याघ्र क्षेत्रातून जातो. या मार्गामुळे बेळगावी-गोवा दरम्यानचे सुमारे २० किलोमीटर अंतर कमी होते. रात्री व सकाळच्या प्रहरी प्राण्यांचा संचार जास्त असतो. कित्येक श्वापदे रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी बाहेर पडतात तर सकाळच्या प्रहरी ती पाण्याच्या शोधार्थ भटकतात. रस्त्यामुळे झालेले जंगलाचे विभाजन ही मुकी श्वापदं समजू नाही शकत. त्यामुळे कित्येक प्राणी रोडकीलचेही शिकार ठरतात. ही बाब लक्षात घेत कर्नाटक रानखात्याने सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंतच्या काळात हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. या क्षेत्रात अवजड वाहनांना प्रवेश करण्यासही सक्त मनाई आहे. ही बंदी प्रभावीपणे लागू करण्यासाठी या मार्गावर कित्येक वन तपासणी नाकेही उभारण्यात आले आहेत. 

अस्वलाचा व्हिडिओ पाहता जांभळीकडून वाळपईला येणाऱ्या मार्गासाठीही वन्यजीव मंडळाने जांभळीकडे ते वाळपई वनक्षेत्रातून प्रवास करणाऱ्या वाहतुकीसाठी वेळेचे बंधन घालावे. असे केल्यास वन्यजीव संरक्षण व विकासकामे या दोन घटकांमध्ये संतुलन राखणे शक्य होईल.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
 प्राध्यापिका आहेत.)