म्हापसा : मायना पाटो, कामुर्ली येथील व्हिली डिकुन्हा यांच्या घराला आग लागून २ लाखांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. सुक्या गवताला लागलेली आग पसरून घराला लागली.
ही घटना सोमवारी दि. १० रोजी सकाळी ११.४० च्या सुमारास घडली. यावेळी डिकुन्हा कुटूंबिय घर बंद करून बाहेर गेले होते. घराच्या मागील बाजूला मोकळ्या जागी असलेल्या सुक्या गवताला कुणीतरी आग लावली होती. उष्णतेमुळे ही आग भडकली व पसरून घराला लागली. यात कौलारू घरातील स्वयंपाकघराची खोली व दुसर्या एका खोलीचे नुकसान झाले. स्वयंपाकघरातील फ्रीज, ओव्हन, इतर घरगुती वस्तू व छप्पर जळाले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार विष्णू गावस, देवेंद्र नाईक, प्रविण गावकर, भिकाजी काळोजी व लविंदर साळगावकर यांनी पर्वरी दलाच्या जवानांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली.