जेष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाले- कोणत्याही बाबतीत सुस्पष्टता नाही.
कोची : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पक्ष नेतृत्वाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. "काँग्रेसमध्ये माझी भूमिका काय आहे?"असे त्यांनी राहुल गांधींना विचारले आहे. शशी थरूर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या मुख्यप्रवाहतून बाजूला केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत महत्त्वाच्या चर्चेत त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही आणि पक्षात त्यांची उपेक्षा केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.थरूर म्हणाले की ते पक्षातील त्यांच्या भूमिकेबद्दल गोंधळलेले आहेत आणि राहुल गांधींनी त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टपणे सांगावे अशी त्यांची इच्छा आहे.
थरूर म्हणाले- राहुल गांधींनी कोणत्याही तक्रारींचे निराकरण केले नाही
राहुल गांधींनी थरूर यांच्या तक्रारींना कोणतेही विशिष्ट उत्तर दिले नाही किंवा त्यांच्या कोणत्याही गंभीर समस्या सोडवल्या नाहीत. थरूर यांना वाटले की राहुल गांधी या प्रकरणात कोणतेही विशिष्ट आश्वासन देण्यास तयार नाहीत.
थरूर यांना पक्षातून बाजूला करण्याची २ कारणे...
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीचे कौतुक करणाऱ्या शशी थरूर यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध अनेक विधाने केली आहेत, त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) त्यांच्यावर नाराज आहे. १५ फेब्रुवारी रोजी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीचे कौतुक केले होते, परंतु पक्षातील काहींनी ते चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे थरूर म्हणाले होते.
तसेच त्यांनी केरळ सरकारच्या धोरणाचेही कौतुक केले आहे.थरूर यांनी एलडीएफ सरकारच्या औद्योगिक धोरणाचे कौतुक करणाऱ्या लेखामुळे केरळ काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला होता. थरूर यांनी त्यांच्या लेखात असेही म्हटले आहे की केरळ हे भारतातील तांत्रिक आणि औद्योगिक बदलांचे नेतृत्व करण्यासाठी योग्य स्थितीत आहे.
केरळ काँग्रेसच्या मुखपत्राने शशी थरूर यांना दिला सल्ला
यानंतर केरळ काँग्रेसने खासदार शशी थरूर यांचे नाव न घेता त्यांना सल्ला दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाच्या आशा धुळीस मिळू नये, असे व्हिकेशनम डेलीच्या संपादकीय लेखात म्हटले आहे.
मुखपत्रात केरळच्या औद्योगिक धोरणावर टीका
मुखपत्रातील संपादकीय लेखात केरळ सरकारच्या औद्योगिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामध्ये, एका परिच्छेदात , केरळचे औद्योगिक क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचे लिहिले होते. लेखात माजी मुख्यमंत्री आर शंकर, सी अच्युत मेनन, के करुणाकरन, ए के अँटनी आणि ओमेन चंडी यांच्या कार्यकाळात झालेल्या औद्योगिक विकासाचा उल्लेख करण्यात आला होता.
एकीकडे काँग्रेसने थरूर यांच्या विधानावर टीका केली तर दुसरीकडे केरळ सरकारने त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला. दरम्यान, प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष के सुधाकरन यांनी केरळ सरकारवर डेटामध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे. सध्या शशी थरूर काँग्रेस नेतृत्त्वावर नाराज असल्याचे दिसत असून 'माझी गरज नसल्यास तसे सांगावे, माझ्याकडे अन्य पर्याय देखील उपलब्ध आहेत' असे त्यांनी म्हटले आहे.