न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत पश्चिम बंगालमधील न्यायालयाने सुनावलेली ही सातवी मृत्युदंडाची शिक्षा असून पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात ही सहावी मृत्युदंडाची शिक्षा आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये एका ३७ वर्षीय पुरूषाने सात महिन्यांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला आणि बलात्कारानंतर त्याने मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. आता न्यायालयाने त्या पाशवी तरुणाच्या या कृत्याला एक भयंकर गुन्हा मानून त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी, कोलकाता येथील बँकशॉल कोर्टातील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सोमवारीच आरोपीला दोषी ठरवले होते आणि मंगळवारी त्याची शिक्षा जाहीर केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी विनंतीही सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली होती. हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' श्रेणीत येतो आणि अशा प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा देणे योग्य ठरेल असे या प्रकरणात, न्यायालयाने म्हटले आहे
ही जघन्य गुन्ह्याची घटना कोलकात्यातील बडतल्ला भागातील आहे. येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आरोपी राजीव घोषने सात महिन्यांच्या निष्पाप मुलीचे अपहरण केले आणि तिच्यासोबत हे जघन्य गुन्हे करून पळून गेला. पोलिसांनी त्याला ५ डिसेंबर रोजी झारग्राम जिल्ह्यातील गोपीवल्लभपूर येथून अटक केली. ५ डिसेंबर रोजीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले,नंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले आणि काही दिवसांनी पुरवणी आरोपपत्र सादर केले. अवघ्या ७५ दिवसांत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून शिक्षा जाहीर केली आहे.
सहा महिन्यांत सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर अजूनही कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.गेल्या सहा महिन्यांत पश्चिम बंगालमधील न्यायालयाने सुनावलेली ही सातवी मृत्युदंडाची शिक्षा आहे. तर पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात ही सहावी मृत्युदंडाची शिक्षा आहे.