पेडणेः ड्रग्ज तस्करी प्रकरणी नायजेरीयन इफेचूक्वूला १० वर्षांचा कारावास

म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचा निवाडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th February, 04:56 pm
पेडणेः ड्रग्ज तस्करी प्रकरणी नायजेरीयन इफेचूक्वूला १० वर्षांचा कारावासम्हापसा : ड्रग्ज तस्करी प्रकरणी नायजेरियन नागरिक इफेचूक्वू डॅव्हिड माडूक्वे यास १० वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रूपये दंडाची शिक्षा म्हापसा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायायालयाने ठोठवली आहे. याबाबतचा निवाडा न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी मंगळवारी १८ रोजी दिला.

पेडणे पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी कोरगाव पेडणे येथे आरोपी इफेचूक्वू माडूक्वे याच्या राहत्या घरी छापा टाकला होता. यात ३०.९० लाखांचा ३०९ ग्रॅम कोकेन व २० लाखांचा २०० ग्रॅम एमडीएमए हा ५० लाख ९० हजार रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला होता. याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम २१ (क) व २२ (क) अन्वये गुन्हा नोंदवून इफेचूक्वू डॅव्हिड माडूक्वे यास अटक केली होती. त्यानंतर चौकशीअंती पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असता संशयित व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर संशयिताला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली दोषी घोषि करत न्यायालयाने वरील शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील रॉय डिसोझा व जेनिफर सांतामारीया यांनी तर संशयिताच्या वतीने अ‍ॅड. राजू पोवळेकर यांनी युक्तीवाद केला.
 

तत्कालीन पेडणे पोलीस निरीक्षक तथा विद्यमान उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपनिरीक्षक तथा विद्यमान निरीक्षक संजित कांदोळकर यांच्यासह उपनिरीक्षक विवेक हळर्णकर व प्रफुल्ल गिरी यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.